Eknath Shinde : राज्याचा कारभार हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे ठाणे पैशांअभावी अस्वस्थ!

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारीचा पगार थकला असून, महत्त्वाच्या औषधांचीही खरेदीही पैशांअभावी रखडली आहे, ठाण्यासाठी नक्कीच भूषणावह नाही
Thane Municipal Corporation, Eknath Shinde
Thane Municipal Corporation, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane News :

साऱ्या राज्याचा कारभार सांभाळत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच प्रशासकीय यंत्रणेवर नामुष्कीची वेळ आली आहे. ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बिकट बनला असून, फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासह काही महत्त्वाच्या खरेदी पैशांअभावी रखडल्या आहेत. आर्थिक सुस्थितीत असलेल्या ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती एवढी बिकट कशी झाली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

ठाणे महापालिकेतील (Thane Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील 126 कोटींचा फरकाचा पहिला हप्ता, तर 20 कोटींचा सेवानिवृत्तीचा पहिला हप्ता वेतन राखीव निधीतून देण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारी सुखावले तरी दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीत जीएसटीपोटी प्राप्त झालेल्या अनुदानातील 69 कोटीच शिल्लक आहेत, तर पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी होणारा खर्च हा 105 कोटींच्या आसपास आहे.

याचा परिणाम फेब्रुवारीच्या आणि मार्चच्या वेतनावर होणार असून, दोन्ही महिन्यांचे वेतन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचेही वेतन झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनामुळे ठाणे महापालिकेच्या तिजोरीवर परिणाम झाल्याचे दिसून आले होते. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यात प्रशासनाला यश आले नव्हते. त्यामुळे पालिकेने नव्या प्रकल्पांना कात्री लावताना जुन्या प्रकल्पांची कामेदेखील थांबवली होती. मालमत्ता कर आणि पाणी देयकांची वसुली वगळता इतर विभागांची अपेक्षित कर वसुली झाली नव्हती.

कोरोना काळात मालमत्ता कर आणि पाणीपुरवठा विभागाने पालिकेच्या तिजोरीला हातभार लावला होता. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीलाही काही प्रमाणात उभारी मिळाली होती. त्यात ठेकेदारांची दिवाळी गोड करण्यासाठी महापालिकेने सुमारे 35 कोटींची देणी दिली. त्याचा परिणाम पुन्हा तिजोरीवर झाल्याचे दिसून आले. त्यातच दुसरीकडे पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा, यासाठी कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा प्रशासनाकडे करण्यास सुरुवात केली. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सातवा वेतन आयोग (Seventh Pay Commission) आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाचा पहिला हप्ता (एकूण 146 कोटी) वेतन राखीव निधीतून देण्यात आला आहे. त्याची झळ पालिकेच्या तिजोरीला बसली आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, ठाणे महापालिकेच्या तिजोरीत सध्या जीएसटीतून जमा झालेल्या 88 कोटींपैकी 69 कोटी शिल्लक आहेत. आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 105 कोटींचा खर्च होतो. त्यामुळे पालिकेला आणखी 30 ते 35 कोटींची गरज आहे. हे सर्व पाहिले तर फेब्रुवारीसह मार्चचेही वेतन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

औषध खरेदी रखडली

ठाणे महापालिकेच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीचा मोठा फटका औषध खरेदीला बसला आहे. दीड ते दोन महिन्यांपासून क्षय रोग तसेच अन्य आजारांवरील औषधांच्या खरेदीच्या फायली निधीअभावी मंजुरीसाठी पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तरीही कर्मचारी शांत

4 मार्च उलटला तरी फेब्रुवारी महिन्याचे वेतन झालेले नाही. मात्र, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता मिळाल्यानेही वेतन न होऊनही कर्मचारी शांत आहेत.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com