Chitra Wagh vs Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी घडलेल्या राजकीय भूकंपामुळे एकच खळबळ उडाली आहे. शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फूटीवरून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. यावर आता चित्रा वाघ यांनी प्रतिउत्तर देत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने भाजपवर 'एक फुल, दो हाफ' अशा शब्दात हल्लाबोल केला आहे. या टीकेला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, " ज्यांचा पक्षच फूलआऊट झालाय त्यांना सारं काही डाऊटफूल वाटणं साहजिक आहे. सर्वज्ञानींची खदखद आम्ही समजू शकतो, ये तो ना घर का रहा ना घाट का?" अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, भाजपने महाराष्ट्रात जे काही केले, त्यामुळे त्यांचीच संपूर्ण देशात बदनामी होत आहे. आता फक्त मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय मल्ल्या यांनाच त्यांच्या पक्षात सामील करून पदे द्यायचे बाकी राहिले आहे. या तिघांपैकी एकाची पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी दुसर्याची नीती आयोगावर आणि तिसर्याची देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करावी. कारण भ्रष्टाचार, लूट, नैतिकता हा त्यांच्यापुढे मुद्दा राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnvis ) वारंवार अजित पवारांना ( Ajit Pawar ) भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात जावे लागेल असे सांगत होते, परंतु त्यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री होते, नंतर ते शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. आता अजित पवारही पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे फडणवीस अर्धे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. महाराष्ट्राची ही अवस्था म्हणून ‘एक फुल दोन हाफ' अशीच झाली आहे. पण जो फुल आहे तोसुद्धा 'डाऊटफुल' असल्याने चिंताग्रस्त चेहऱ्याने वावरतो आहे. जे शिंदेच्या बाबतीत घडले तेच नव्या फुटीर गटाबाबत घडत आहे. 'एक (डाऊट) फुल, दोन हाफ' हा नवा चित्रपट राज्यात लागला आहे, असेही अग्रलेखात म्हटले आहे.त