मुंबई : आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. २४ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र, सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी एका जिल्ह्ययातील आणि दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी दुसऱ्याच जिल्ह्यातील केंद्र, असा सावळा गोंध सुरु आहे. परीक्षा पुढे ढकलूनही नियोजनातील गोंधळाबाबत परीक्षार्थी संताप व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी संताप व्यक्त करत महाविकास आघाडीला घरा आहेर दिला आहे.
या संदर्भात रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले, एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिअलोकेट करावेत, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे.
तसेच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढे ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा एमपीएससी मार्फतच घेण्यात याव्यात, ही कळकळीची विनंती, असेही पवार म्हणाले आहेत.
आरोग्य विभागामध्ये सहा हजार पदांसाठी भरती होत आहे. त्यासाठी राज्यभरातून सुमारे चार लाख उमेदवारांनी अर्ज भरला आहे. या सर्व उमेदवारांना या नियोजनातील गोंधळाचा फटका बसला. यापूर्वी परीक्षा नियोजनातील गोंधळामुळे परीक्षा रद्द करावी लागली होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. 'न्यासा' कंपनीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही याच कंपनीद्वारे २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबरला परीक्षा घेतली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.