Mumbai: अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश स्थिती, शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न राज्यात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचा प्रचार करण्यासाठी इतर राज्यांमध्ये उपस्थिती लावत आहेत. यावर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून जोरदार टीकास्त्र डागले आहे.
'आधुनिक नीरो' असा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करीत 'गद्दार हृदयसम्राट' असे त्यांना संबोधले आहे. "आधुनिक नीरो" अशी मुख्यमंत्र्यांची संभावना करतानाच त्यांना 'राजा मस्त, प्रजा त्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार' असे म्हणत डिवचले आहे.
"तेलंगणा व जयपुरातील निवडणुकीत भाजप उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम राज्यातील गद्दार हृदयसम्राटांना देण्यात आले होते. निवडणुकांत खोके पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे बजावणाऱ्या गद्दार हृदयसम्राटांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पानेच पुसली," अशी टीका मुख्यमंत्र्यांवर करण्यात आली आहे.
"कटकारस्थाने करून सत्तेवर आलेला नीरो रोम जळत असताना फिडल हे वाद्य वाजवत बसला होता आणि अवकाळीच्या संकटात शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना महाराष्ट्राचे आधुनिक नीरो निवडणूक प्रचारात रमले आहेत. राजा मस्त आणि प्रजा त्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार अशी स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हती," अशी खंत अग्रलेखात व्यक्त केली आहे.
.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाराष्ट्रातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना या संकटात त्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर जाण्याचे सोडून मिंधे सरकारचे मुख्यमंत्री तेलंगणात निवडणूक प्रचारात मग्न आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीसही कायम प्रचारातच गुंतले आहेत, तर अजित पवार हे कोमात आहेत. महाराष्ट्राचा ‘पालक’ असलेला शेतकरी संकटात असताना त्याला भेटण्याचे सौजन्य न दाखवता मुख्यमंत्री आपले ‘मालक’ असलेल्या पक्षाच्या प्रचाराला निघाले आहेत.
पालकाची काळजी सोडून मालकाची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्या मिंध्यांना काय म्हणावे? परीट घडीचे पांढरेशुभ्र कपडे घालून तेलंगणात प्रचार करत असताना अवकाळीच्या तडाख्याने संकटात सापडलेला महाराष्ट्राचा शेतकरी आपल्याकडे मदतीसाठी आशेने बघतो आहे, याचे भान नसेल तर यांना मुख्यमंत्री तरी कसे म्हणायचे?, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.