Mumbra Shinde Vs Thackeray: ठाकरेंचे बॅनर फाडणाऱ्यांच्या वाहनाचा क्रमांक आमदार आव्हाडांनी केला जाहीर
Thane News: ठाण्यातील मुब्रा येथील शिवसेनेच्या शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. मुब्रा येथील ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोझर फिरवण्यात आल्यामुळे मुंब्य्रात राजकारण तापलं आहे. यातच उद्धव ठाकरे स्वत: शनिवारी मुंब्य्रातील शाखेला भेट देण्यासाठी दाखल झाले आहेत.
उद्धव ठाकरे या शाखेला भेट देण्यासाठी येणार असल्याने त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. मात्र, हे फलक फाडण्यात आले, पण ज्या वाहनातून फलक फाडण्यासाठी इसम आले होते, त्या वाहनाचा क्रमांक राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला आहे. तसेच ती गाडी कोणाची आहे, याचा शोध घ्या, अशी मागणी आव्हाडांनी पोलिसांकडे केली आहे.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी मुंब्रा येथे शिवसेना मध्यवर्ती शाखा सुरू केली. आता ही शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. यानंतर शिंदे गटाकडून ही शाखा जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर आता, शिंदे गटाकडून ही शाखा उभारणीचे काम करण्यात येत आहे, यासाठी मंगळवारी भूमिपूजनदेखील करण्यात आले.
पण आता या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे हे मुंब्र्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे मुंब्रा शहरात शाखेच्या ठिकाणी भेट द्यायला येणार असल्याने कळवा - मुंब्रा येथील आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लावले होते. बॅनरवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेसच्या सोनिया गांधी यांचे छायाचित्र आहेत. यातील काही बॅनर अज्ञातांनी फाडले. यावरून आव्हाडांनी संताप व्यक्त केला.
"एक होर्डिंग फाडायला किमान 15 मिनिटं लागतात आणि "सर्वत्र नजर असणाऱ्या" पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी पोलिसांवर केला. त्यापाठोपाठ त्यांनी आणखी एक संदेश प्रसारित केला आहे.
मुंब्रा परिसरामध्ये काल रात्री बॅनर्स फाडण्यात आले. पोलिसांना सूचना देऊनही पोलिस काहीच करु शकले नाहीत. माझं मत असं आहे की, पोलिसांचाही यामध्ये हात होता. आता पोलिसांना मी ज्या गाडीतून बॅनर्स फाडणारे आले होते, त्या गाडीचा नंबर देत आहे", असे सांगत आव्हाडांनी MH43 1278 हा क्रमांक जाहीर केला.
"आता बघुयात पोलिस ही गाडी शोधतात का ? आणि गाडी कोण चालवत होतं, याची नोंद घेतात का ? आणि त्यांच्यावर कारवाई करतात का ? याला थांबवा, त्याला थांबवा… मुंब्रा परिसरामध्ये घबराटीचे वातावरण तयार करा, दहशतीचे वातावरण तयार करा, हे करण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे गरजेचे आहे ते पोलिसांनी करावं, ती गाडी कोणाची आहे याचा आता शोध घ्या", असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिसांना केले आहे.
Edited by : Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.