Mumbai News : शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे काल (दि.१९ जून) पार पडला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय फटकेबाजी करत शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. 'काँग्रेसच्या काळात कधी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढायची गरज पडली नाही. मात्र मोदींच्या काळात मात्र हिंदूना मोर्चा काढावा लागत आहे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. (Uddhav Thackeray Speech Then who is the Hindutva BJP or Congress)
उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही हिंदुत्व सोडलं अशी टीका आमच्यावर केली जाते. कारण काय तर आम्ही काँग्रेससोबत गेलो. म्हणून सहज आठवलं की, काँग्रेसचा जमाना होता, तेव्हा आपली (भाजपसोबत) युती होती. त्यावेळेला काँग्रेसची राजवट होती, म्हणजे नरसिंहराव पंतप्रधान होते. राजीव गांधी पंतप्रधान होते. तेव्हा आपल्या देशात आरोळ्या व्हायच्या की, इस्लाम खतरे मे है. आता हे (भाजप) बसलेत दहा वर्षे, आता घोषणा काय होत आहेत की हिंदू खतरे में है. मग आता हिंदुत्ववादी कोण? काँग्रेस का भाजप? काँग्रेसच्या काळात कधी हिंदू जनआक्रोश काढायची वेळ आली होती? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah) महाराष्ट्रात यावे लागते. महाराष्ट्रात येवून त्यांना उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे असा जप करावा लागतो. भाजपवाले सगळेच उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे असा जप करत आहेत. पण, उद्धव ठाकरे हा एकटा नाही, हे पुढे बसलेले सगळे उद्धव ठाकरे आहेत. तिकडे जपानमध्ये एक दिवस भूकंप झाला नाही तर लोकांना धक्का बसतो. तरीही जपान उभा राहिला आहे. तुमच्या साथीने आपण पुन्हा उभे राहू, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मेळाव्यात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाची लस तयार केली,असे वक्तव्य केले होते. मोदींनी कोरोनाप्रतिबंधक लस तयार केल्यामुळे कोट्यवधी लोक जीवंत असल्याचं फडणवीस म्हणाले होते.
यावरून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला. फडणवीसांच्या या दाव्यावर ठाकरे म्हणाले, "आज हास्यजत्रेचा प्रयोग झाला. पण काल फडणवीसांचा एक प्रयोग झाला, कुठून यांच्या डोक्यात व्हायरस घुसलाय तेच कळत नाही, कोव्हीडची लस कुणीतरी तयार केली, मग बाकीचे गवत उपटत बसले होते?" अशा शब्दात ठाकरेंनी फडणवीसांवर सडकून टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.