

नवनीत बऱ्हाटे
Corporators Election : आठ महिन्यांपासून रखडलेल्या उल्हासनगरच्या सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीला पुन्हा एकदा ‘ब्रेक’ लागला आहे. २४ सप्टेंबरची निवड अवघ्या काही तासांवर असतानाच न्यायालयीन घडामोडींमुळे प्रक्रिया आणखीन तीन दिवस पुढे गेली. महापौरांच्या वतीने निवडणुकीसाठी सात दिवसांची मुदत मागण्यात आली होती; मात्र न्यायालयाकडून तीन दिवसांचीच मुदत मिळाल्याने आता २८ सप्टेंबरच्या नव्या मुहूर्ताकडे ४२ इच्छुकांचे डोळे लागले आहेत.
गेल्या आठ महिन्यांपासून राजकीय व न्यायालयीन पेचात अडकलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेतील सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा सस्पेन्स आणखी तीन दिवस वाढला आहे. २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष महासभेच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयातील घडामोडींमुळे निवड प्रक्रिया पुढे जाणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी दिली. महापौरांच्या वकिलांनी निवडणुकीसाठी सात दिवसांची मुदत मागितली होती; मात्र तीन दिवसांची मुदत मिळाल्याने आता २८ सप्टेंबर रोजी निवड होईल, असे वधारिया यांनी सांगितले.
जानेवारीतील महापालिका निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्यांची निवड अपेक्षित होती. मात्र विविध कारणांमुळे प्रक्रिया सातत्याने रखडली. सप्टेंबरमध्ये निवड प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर महापौर अश्विनी निकम यांनी विशेष महासभा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. त्या विरोधात भाजपने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयीन आदेशानंतर प्रशासनाने २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विशेष महासभा बोलावली होती.
सात जागांसाठी तब्बल ४२ इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने राजकीय चुरस शिगेला पोहोचली आहे. भाजपकडून धनंजय बोडारे, राजेंद्र (बाळा) श्रीखंडे, कपिल अडसूळ आणि प्रदीप रामचंदानी यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. शिवसेनेच्या तीन जागांसाठी मात्र इच्छुकांची मोठी गर्दी असल्याने पक्षश्रेष्ठी कोणाच्या गळ्यात स्वीकृत पदाची माळ घालणार, याची उत्सुकता कायम आहे.
महापौरांसह विक्की लबाना आणि पूजा भोईर यांच्या अन्य दोन याचिका फेटाळण्यात आल्याचे राजेश वधारिया यांनी सांगितले. अपात्र नगरसेवकांसंबंधीचे खटले पूर्वीप्रमाणे उच्च न्यायालयातच चालतील, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत महापालिकेकडून सुधारित निवड कार्यक्रमाची अधिकृत सूचना जाहीर झालेली नव्हती. त्यामुळे ‘सात जागा, ४२ इच्छुक आणि तीन दिवसांची वाढलेली प्रतीक्षा’ यामुळे स्वीकृत नगरसेवक निवडीचा राजकीय सस्पेन्स कायम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.