उल्हासनगरमध्ये राजकीय भूकंप? पप्पू कलानी-जयंत पाटलांमध्ये मध्यरात्रीपर्यंत खलबत

जयंत पाटील (Jayant Patil) आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Aavhad) यांनी पप्पू कलानी यांची घरी जाऊन भेट घेतली
Pappu Kalani-omi kalani.
Pappu Kalani-omi kalani.Sarkarnama

उल्हासनगर : शहराच्या राजकारणात लवकरच भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. कारण ४ वेळचे आमदार पप्पू कलानी राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. याला कारण ठरले आहे नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Aavhad) यांनी पप्पू कलानी (Pappu Kalani) यांची घरी जाऊन घेतलेली भेट. मध्यरात्री तब्बल साडेतीन वाजेपर्यंत या नेत्यांमध्ये बैठक पार पडली. हिच बैठक आता महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला देखील धक्का मानला जात आहे.

उल्हासनगरच्या राजकारणात कलानी या नावाला मोठं वलय आहे. कारण आधी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पप्पू कलानी यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला आणि १९९० पासून सलग ४ वेळा आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. यापैकी एकदा काँग्रेस, एकदा आरपीआय, तर दोन वेळा अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडून आले. २०१४ साली त्यांच्या पत्नी ज्योती कलानी या राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आल्या. या दरम्यानच्या काळात पप्पू कलानी यांना एका हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे ते १५ वर्ष तुरुंगात होते. आता पप्पू कलानी हे सध्या बाहेर आले आहेत. इतकंच नव्हे, तर त्यांनी शहरात लोकांच्या गाठीभेटी, कार्यक्रमांना देखील हजेरी लावायला सुरुवात केली आहे.

सोबतच दोन दिवसांपूर्वी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पप्पू कलानी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. रात्री तब्बल साडेतीन वाजेपर्यंत हे नेते 'कलानी महल'मध्ये होते. त्यामुळे पप्पू कलानी हे शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना उल्हासनगरमध्ये उधाण आले आहे. हि भेट एक प्रकारे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला देखील धक्का मानला जात आहे. कारण पप्पू कलानी तुरुंगामध्ये असताना त्यांचा मुलगा ओमी कलानी यांनी टीम ओमी कलानी ही राजकीय संघटना स्थापन करत भाजपच्या तिकिटावर शहरात आपले २२ नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे कधी नव्हे ते उल्हासनगरमध्ये भाजपला महापौरपद मिळाले. नंतरच्या काळात पंचम ओमी कलानी या सुद्धा महापौरपदी विराजमान झाल्या.

पुढे मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर टीम ओमी कलानीने भाजपचे समर्थन काढून महाविकास आघाडीला समर्थन दिले, त्यामुळे उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उल्हासनगरमध्ये फार थोडे अस्तित्व आहे. मात्र आता पप्पू कलानी हे राष्ट्रवादीत सक्रिय झाले, तर उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीला एकहाती सत्ता काबीज करणे सोपे होवू शकते. त्यामुळे आता पप्पू कलानी हे नेमका काय निर्णय घेतात आणि शहराच्या राजकारणात काय भूकंप होतो, याकडे उल्हासनगरवासीयांचे लक्ष लागले आहे.

उल्हासनगर शहराच्या राजकारणाला लवकरच एक नवी दिशा मिळेल. तसेच येणारा महापौर हा देखील टीम ओमी कलानीचाच असेल.

- कमलेश निकम, कलानी पप्पु कलानी यांचे प्रवक्ते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com