Mumbai News, 28 August : महाविकास आघाडीतील (MVA) प्रमुख नेत्यांची बुधवारी (ता.28ऑगस्ट) रोजी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसह शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यात महायुती सरकारला अपयश आल्याचा विरोधकांकडून आरोप होत असतानाच बदलापूर (Badlapur) येथील लैगिंक अत्याचाराची घटना समोर आली. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
सरकारचा पोलिसांवर वचक नाही यावरून विरोधक सरकारवर टीका करत असतानाच मालवण (Malvan) येथे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेमुळे तर विरोधकांना सरकारवर टीका करण्याचं आयतं कोलीत मिळालं.
याच सर्व पार्श्वभूमीवर युतीच्या सरकारचा भोंगळ कारभार जनतेसमोर आणण्यासाठी आणि आगामी विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी आजची 'मातोश्री'वरील बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मागील काही दिवसांमध्ये राज्यात घडलेल्या गंभीर घटना, राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.
राज्यातील कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा तसेच बदलापूरमधील घटना, तसंच नुकतीच मालवणमधील शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची घटना यावर चर्चा करुन आजच्या या बैठकीनंतर आता महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने सरकारच्या भोंगळ कारभाराविरोधात एल्गार करण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.