
Mumbai News, 02 Jan : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष (Santosh Deshmukh) देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा दावा विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांकडून केला जात आहे. शिवाय वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही होत आहेत.
अशातच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड तब्बल 22 दिवसांनंतर पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला आणि त्यानंतर त्याला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य करताना विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी खळबळजनक दावा केला आहे.
वडेट्टीवारांनी वाल्मिक कराडचा (Walmik Karad) एन्काऊंटर केला जाऊ शकतो, त्यामुळे त्याला वाचवा अशी आपणाला विश्वसनीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याने माहिती दिल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, "मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो. त्यामुळे छोट्या आकाला वाचवा. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर करू नका.
मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर होत असेल तर पुरावा नष्ट करण्यासाठी असे केले जाऊ शकते, अशी माहिती मला विश्वसनीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे, त्यामुळे काहीही होऊ शकते." असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. तर यावेळी त्यांनी पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचंही म्हटलं आहे.
22 दिवस झाले तरीही पोलिस कराडला पकडू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे त्यांनी लक्ष दिले नाही तर पोलिस विभागाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाय सीआयडीचा तपास सुरू होता तरी एसआयटी आणली हे सर्व तपास भरकटवण्यासाठी तर नसेल ना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, त्यांनी एक्सवर एक पोस्ट करत तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "महायुती (Mahayuti) सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्याने बीड पोलिस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मिक कराड पोलिस कोठडी मध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात.
आरोपीचे लाड पुवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण सगळच मिळेल! वाल्मिक कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा?
सरकारने कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. कराडवर अजूनही संतोष देशमुख हत्या असो की मकोका अंतर्गत गुन्हा ही दाखल झालेलं नाही, त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे!"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.