Nagar News : आमदार लंके लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे, तसे मतदारसंघासह नगर दक्षिणमध्ये चांगले सक्रिय झाले आहेत. प्रसिद्धी माध्यमांशी दूर राहून गाठीभेटींवर भर देत आहेत. मतदारसंघातील विकासकामांवर लक्ष ठेवून नियोजन करत आहे. यातून जनसंपर्कावर भर देण्याचे काम आमदार लंके करत आहेत. यातून खासदार सुजय विखे आणि त्यांच्यातील राजकीय द्वंद अधिक जोर धरताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी मतदारसंघातील विरोधकांना बाहेरच्यांचे डफडे वाजवण्यावरून इशारा दिला आहे. आमदार लंके यांचा हा रोख खासदार सुजय विखे आणि त्यांच्या समर्थकांकडे होता. 'बाहेरच्या काहींचे ऐकून डफडे वाजवू नका. ते नुसते एकदा येऊन वाजवून अन् बोलून काही होत नसते', असे आमदार लंके यांनी सुनावले आहे.
पारनेर तालुक्यातील सात कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा प्रारंभ झाला. त्यावेळी त्यांनी मतदारसंघातील खासदार विखे (Sujay vikhe)समर्थकांवर नाव न घेता टीका केली. आमदार लंके म्हणाले, "पारनेर तालुक्यात सोशल मीडियावरील वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. त्यांनी बाहेरच्या काहींचे डफडे वाजण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे तालुक्याच्या चारही कोपऱ्यात डफड्यावाल्यांची संख्या वाढली आहे.
नुसते एकदा येऊन वाजवून अन् बोलून काही होत नसते". प्रत्यक्ष बोलून शाश्वत विकासकामांवर भर देऊन जनतेला दाखवून द्यावे लागते. तेव्हा लोक विश्वास ठेवतात. म्हणून आपण जे बोलतो तेच करतो, बाकीच्यासारखे नुसते बोलून लोकांना झुलवत ठेवत असणाऱ्या मधले आपण नाही, असेही लंके म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मतदारसंघातील मतदारांना सावध करताना म्हटले की, "तुम्ही नुसते एकदा डाळ-साखर मिळाली म्हणजे भुलून न जाता खाऊन गप्प राहू नका. ध्यान ठेवा, हे तुमच्या रेशनकार्डवर सुद्धा याचा बोजा चढवतील. या केंद्र सरकारचा नेम नाही".
उसना बॅलन्स घेऊन डफडे वाजविणाऱ्या वीरांचा देखील, यावेळी आमदार लंके यांनी समाचार घेतला. त्यांनाही लवकर जागेवर आणू, काळजी करू नका. कोण कामाचा माणूस आहे आणि कोण बिनकामाचा हे लवकर ओळखा, असा सल्ला देखील आमदार लंके यांनी यावेळी दिला.
(Edited by - Sachin Waghmare)