नगर : 'मी कोणाच्याही खांद्यावर हात ठेवत नाही. शंकरराव गडाख हे पहिले मंत्री आहेत, की ज्यांच्या खांद्यावर मी स्वतः जाणीवपूर्वक खांद्यावर हात ठेवला आहे. त्यांच्यामागे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या कामाची पुण्याई आहे,' असे आशीर्वाद ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गडाख बंधुंना दिले.
मंत्री झाल्यानंतर शंकरराव गडाख यांनी बंधू यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्यासह आज राळेगणसिद्धी येथे हजारे यांची भेट घेतली. हजारे यांचे सध्या मौन सुरू आहे. त्यामुळे त्यांनी दोघा बंधुंच्या खांद्यावर हात ठेवून खुनावून आशीर्वाद दिले. हजारे यांना जे सांगायचे, ते त्यांनी लिखित पत्राच्या स्वरुपात गडाख बुंधुंना दिले.
लेखी संदेशात हजारे यांनी म्हटले आहे, की ईश्वराने मनुष्याला दिलेला जन्म हा सत्ता व संपत्ती कमविण्यासाठी नसून समाजाची सेवा करण्यासाठी आहे, हे यशवंतराव गडाख यांनी दाखवून दिले आहे. राजकारण आणि समाजकारण किंवा धर्मकारण हे वेगळे नसते. फळाची अपेक्षा न करता केलेले कोणतेही कर्म ही ईश्वराची पूजा असते, हे यशवंतराव गडाख यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. अशा सर्वगुणसंपन्न वडिलांच्या संस्कारात आपण दोघे राम-लक्ष्मण म्हणून लहानाचे मोठे झालात. त्यांचे सर्व गुण शंकरराव तुमच्यात पाहण्यास मिळतात. माणसे जोडण्याची कामे करता, ही सामाजिक दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. तुम्हा राम-लक्ष्मण सारख्या जोडीला कोणाचीही दृष्ट लागू नये, अशा शुभेच्छा.
दरम्यान, हजारे व गडाख बुंधू यांच्यात यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वाचनालय चळवळ, गाव दत्तक योजना, अशा अनेक सामाजिक कार्यांविषयी चर्चा झाली. सुमारे 20 वर्षांपूर्वी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना हजारे यांच्याच हस्ते झाली होती, त्याची आठवण या निमित्ताने हजारे यांना आली. त्यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.