
Nagar News : घरातील विधवांना कपाळावर कुंकू लावण्याची व मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का ? विधवा महिला औक्षण करू शकतात का ? विधुर पुरुषांचे वा विधवा महिलांचे पुनर्विवाह होतात का ? महिलांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे, असे बंधन आहे का ? तुमच्या कुटुंबातील विधवांना हळदी-कुंकवासारख्या शुभकार्यात बोलावले जाते का? अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे नगरमध्ये अस्वस्थता व्यक्त होत आहे.
मराठा व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणातील सामाजिक स्थिती तपासण्याच्या या प्रश्नांना उत्तरे देताना अनेकांची तारांबळ उडत आहे. मराठा समाज आरक्षणाचा (Maratha resarvation) विषय गाजत आहे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशाने राज्यभर मराठा सर्वेक्षण सुरु आहे. मात्र, या सर्वेक्षणातील प्रश्नावली अनेकांना अडचणीची वाटू लागली आहे.
कुटुंबातील मुलींचे लग्न साधारण कोणत्या वयात केले जाते?, मुलांचे लग्न उशिरा होण्याची कारणे? कुणाचा आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह झाला आहे का? जागरण गोंधळ किंवा अन्य विधीसाठी कोंबडा-बकर्याचा बळी देता का? पहिले अपत्य मुलगाच झाला पाहिजे, अशी मानसिकता आहे का? आजारी व्यक्तीची दृष्ट काढणे, अंगारा लावणे, गंडा बांधणे असे प्रकार करतात काय? कुटुंबात दहा वर्षांत कुणी आत्महत्या केली आहे का? असेल तर कारण काय?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देताना देणार्यांच्या कपाळावर आठ्या उमटत आहेत.
कुत्रा वा माकड चावले, तर कुणाकडे उपचार घेता? कावीळ झाली तर कुणाकडे उपचार घेता? घरात पाणी कोण भरते? मानसिक आरोग्यावर उपचार घेता का? एवढेच नाही तर तुम्ही आंघोळ कुठे करता? यासारख्या अनपेक्षित प्रश्नांची उत्तरे सावधपणे दिली जात असल्याचा प्रत्यय घरोघरी जाणार्या सरकारी कर्मचार्यांना येतो आहे. यातून काही ठिकाणी सर्वे करणार्या कर्मचार्यांना रोषाला देखील समोरे जावे लागत आहे. सरकारविरोधात संताप देखील व्यक्त केला जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आरक्षणासंदर्भातील मुख्य मागण्या मान्य झाल्याने नगरमध्ये त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आमदार संग्राम जगताप (Sangram jagtap) यांच्या उपस्थितीत जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जल्लोष करण्यात आला. राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला असून त्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व आनंदोत्सव साजरा केला आहे. यावेळी पेढे वाटप करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.