चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर चारच महिन्यांत घोटाळ्यांनी बॅंक हादरली आहे. कुणाच्या सांगितल्याने किंवा म्हटल्याने बॅंकेचे कामकाज चालत नाही, तर सहकार कायद्यांनुसार प्रक्रिया होतात. तब्बल दीड कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे आता या बॅंकेवर प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी राज्याचे माजी अर्थमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे उघडकीस येत आहेत. त्यामुळे सहकार कायद्याच्या तरतुदीनुसार गैरव्यवहाराची चौकशी करून बॅंकेवर प्रशासक बसविण्यात यावा. सहकार कायद्यानुसार सहकारी बॅंकेचे कामकाज चालविले जाते. मात्र, येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. हा प्रकार सहकार कायद्याविरुद्ध सुरू आहे. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषी आढळल्यास जिल्हा बॅंकेवर प्रशासक बसविण्यात यावा. प्रशासक हा कुणी मागणी केली म्हणून बसविला जात नाही आणि कुणी हटवावा म्हटल्यास प्रशासक हटविले जात नाही. तर, सहकार कायद्यानुसार या सर्व प्रक्रिया पार पाडल्या जातात.
रोखपाल घाटेला पळवण्यात कुणाचा हात ?
खातेदारांच्या ठेवीवर सुमारे दीड कोटी रुपयांचा डल्ला मारणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा रोखपाल निखिल घाटे यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, घाटे पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी काही संचालक सक्रिय झाले आहे. त्यांच्याच मदतीने त्याने चंद्रपुरातून पलायन केले आहे. अध्यक्ष संतोष रावतसुद्धा घाटे याच्यावरील कारवाईबाबत फारसे उत्सुक नाहीत. ज्या व्यक्तीने घोटाळ्याचे 48 लाख रुपये परत केले. त्याच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्याऐवजी अध्यक्ष चालढकल करीत असल्याने बॅंकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
चंद्रपुरातील जिल्हा परिषदेसमोरील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेतील रोखपाल निखिल घाटे यांनी ठेवीदारांच्या सुमारे दीड कोटी रुपयांना चुना लावला. या घोटाळ्याचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अध्यक्ष संतोष रावत यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत बॅंक घोटाळ्यांनी हादरली. दिवंगत संचालक अनिल खनके यांचा घाटे हा सख्खा भाचा आहे. खनके हे रावत यांच्या कंपूत होते. त्यामुळेच घाटे यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सुरुवातीला थातुरमातूर तक्रार देण्यात आली. तेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. प्रकरणाची झळ आपल्यापर्यंत पोहोचेल, असे लक्षात आल्यानंतर रावत यांनी अधिकाऱ्यांना दुसरी तक्रार द्यायला लावली. घाटे यांच्यावर भादंवी 409 अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
घाटे बॅंकेतील पैसे काही संचालकांना नाममात्र व्याजावर वापरायला द्यायचा, अशी माहिती आहे. त्यामुळे घाटे पोलिसांच्या हाती लागला तर आपले बिंग फुटेल, असे काही संचालकांना वाटत आहे. त्यामुळे घाटे याला थेट पोलिसांच्या हवाली करण्याची संधी असतानाही त्यांच्या पलायनाची व्यवस्था पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या लाभार्थी संचालकांनी केली. घाटेंच्या कुटुंबीयांनी अठ्ठेचाळीस लाख रुपये बॅंकेत जमा केले. ही घोटाळा केल्याची प्रत्यक्ष कबुली आणि पुरावाच होता. मात्र, त्यांच्या निलंबनाबाबत अध्यक्ष फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. चौकशीत दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई करू, अशी संदिग्ध भूमिका बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी व्यक्त केली.
प्रामाणिक कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देणारे अध्यक्ष भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या पाठीशी कसे, असा संताप आता व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची झळ आपल्यापर्यंत पोहोचू शकते, याची खात्री रावत आणि त्यांच्या कंपूला झाली आहे. त्यामुळेच आतल्या गोटातील माहिती माध्यमापर्यंत पोहोचतेच कशी, यावरून रावत कर्मचाऱ्यांवर संतापल्याची माहिती आहे. मागील चार महिन्यांतील अनेक गैरव्यवहारांचा लेखाजोखा बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी पुढे आणला
आहे. सततच्या गैरव्यवहारामुळे बॅंकेची पत घसरत आहे. बॅंकेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे बॅंक वाचविण्यासाठी गरज पडल्यास आम्ही खुलेआम पुढे येऊ. मात्र पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाचा बुरखा पांघरलेल्या या संचालकांना उघडे पाडा, अशी विनंती कर्मचाऱ्यांनी केली.
तक्रारकर्त्याला चोर ठरविण्याचा प्रयत्न
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील रोखपाल निखिल घाटे यांनी तब्बल पन्नास लाख रुपये हडप केल्याची तक्रार जनता शासकीय -निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था, चंद्रपूर यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही. पोटे यांच्याकडे केली. त्यामुळेच बॅंकेतील या घोटाळ्याची दखल घेणे अध्यक्षांना भाग पडले. मात्र, आता रावत यांच्या सल्लागारांनी तक्रारकर्त्यालाच चोर ठरविण्याची रणनीती आखली आहे. या सल्लागाराने आजवर अनेक अध्यक्षांना गोत्यात आणले. हा पूर्वेतिहास ठाऊक असणाऱ्यांना आता रावत यांची काळजी वाटायला लागली आहे. बॅंकेतील भ्रष्ट कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याऐवजी तक्रारकर्ताच कसा दोषी आहे, हे हा सल्लागार अनेकांच्या गळी उतरवीत आहे.
Edited By : Atul Meher
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.