
मालेगाव : अतिक्रमण नाही असा एकही रस्ता या शहरात नाही. अतिक्रमणाचे अडथळे, धूळ, प्रदुषण एव्हढे की चालणेही अवघड. अनेकदा तक्रार करुनही राजकीय नेते उदासीन. एव्हढेच काय काही अतिक्रमणे तर राजकीय कार्यकर्ते, नेत्यांचीच आहेत. त्याविरोधात नागरीक मूक असले तरी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याने आज वीस हजार विद्यार्थी शाळेला दांडी मारुन रस्त्यावर उतरले. 'अतिक्रमण हटाओ, जान बचाओ' या घोषणांनी त्यांनी शहर डोक्यावर घेतले.
तीस शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी वाढते अतिक्रमण, अतिक्रमणांनी वेढलेल्या शाळा, धुळ, ध्वनीप्रदुषण या विरोधात आज एल्गार पुकारला. वीस हजारहून अधिक विद्यार्थी या मागणीसाठी किदवाई रोड व भंगार बाजार रस्त्यावर सुमारे दोन तास ठिय्या मांडून बसले. त्यानंतर सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रांताधिकारी अजय मोरे, सहाय्यक आयुक्त विलास गोसावी यांनी निवेदन दिले.
आवामी पार्टीचे रिजवान बॅटरीवाला यांनी सात दिवसात कार्यवाही न झाल्यास पाच कार्यकर्त्यांसह महापालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. आंदोलनास निहाल अन्सारी, जमील क्रांती, सतीश कलंत्री, निखील पवार, रामदास पाटील, रईस अन्सारी, डॉ. अनिस अहमद, मुर्तुजा अन्सारी, शब्बीर पंजाबी, खयाल अन्सारी, जियाउर रहेमान, युसूफ इलियास, जमील अन्सारी, आबीद अन्सारी, साजीद अहमद आदींसह जेएटी, एटीटी, मालेगाव, काकाणी, स्वेस, जैनब, गुलशन, पॅरेडाईज व मालेगाव गर्ल्स यासह तीस शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले.
विद्यार्थ्यांनी अतिक्रमण विरोधी फलक हाती घेऊन आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर अडथळे लावून पोलिसांनी दोन्ही रस्ते रहदारीसाठी बंद केले होते. उपअधिक्षक रत्नाकर नवले, निरीक्षक व्ही.एन. ठाकुरवाड, मसुद खान व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अतिक्रमण न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थी, पालक, स्वयंसेवी संघटना व संस्थाचालकांनी दिला.
शहरातील अतिक्रमण हटवावे, मुख्य रस्त्यांचे अतिक्रमण हटविल्याशिवाय झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण काढू नये. मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढल्यानंतर नव्याने अतिक्रमण होणार नाही या साठी उपाययोजना करावी या मागण्यांचा आंदोलनात समावेश होता. या आंदोलनाने राजकीय नेते मात्र धास्तावले.
* शहरात आज या लक्षवेधी आंदोलनाची चर्चा सुरु होती.
* मनपा प्रशासनाने खंबीर भूमिका घेत अतिक्रमण हटवावे अशी मागणी होती.
* आंदोलनस्थळी खयाल अन्सारी यांची शेरोशायरी विद्यार्थ्यांची दाद घेवून गेली.
* विद्यार्थी मोठ्या जल्लोषात घोषणाबाजी करत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.