देशाला हादरवून टाकणाऱ्या हत्याकांडाचा आरोप तिच्यावर झाला, मात्र बालविवाह झाल्यानंतर तिच्या वाट्याला जे अमानुष प्रकार आले तेही हादरवून सोडणारेच होते. त्याचाच बदला घेण्यासाठी तिने बंदूक उचलली होती. तिला या जगाचा निरोप घेऊन अनेक वर्षे झाली, मात्री तिच्या भूमीत ती अद्यापही जिवंत आहे लोकगीतांच्या माध्यमातून, कथांच्या (bandit queen phoolan devi story) माध्यमातून. खरंतर ती डाकू, 22 जणांच्या हत्याकांडाचा तिच्यावर आरोप झाला, मात्र उत्तर प्रदेशातील चंबळच्या खोऱ्यात तिची प्रतिमा एखाद्या नायिकेसारखी आहे.
बालविवाहानंतर अमानुष अत्याचार सहन केलेल्या, सामूहिक बलात्काराचा बळी ठरलेल्या या महिलेनं नंतर बंदुकीच्या जोरावर आपल्या भागातील बालविवाह बंद केले. भलेही तिचा मार्ग चुकीचा होता, पण तिने उत्तर प्रदेशातील बालविवाहांची प्रथा रोखली होती. आत्मसमर्पण केल्यानंतर ती संसदेत पोहोचली. खासदार असतानाच तिचा खून करण्यात आला. होय, बरोबर ओळखलात, फूलन देवी! 'बँडिट क्वीन' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या फुलन देवी!
'रील लाइफ' मधील म्हणजे सिनेसृष्टीत सर्वात खतरनाक खलनायक कोण, असा प्रश्न विचारला तर उत्तर येईल शोले चित्रपटातील गब्बर सिंग! 1980 च्या दशकात 'रीयल लाइफ'मध्ये म्हणजे वास्तव जीवनात चंबळच्या खोऱ्यात फुलन देवी यांची गब्बर सिंगपेक्षा अधिक दहशत होती. फुलन देवींचा नेम अचूक होता, त्यापेक्षा कठोर त्यांचं हृदय बनलेलं होतं. महिलेचं मन कोमल असतं. मग फुलन देवी इतक्या कठोर मनाच्या का बनल्या होत्या. चुलत्यानं जमीन हडप केली, चोरीच्या खोट्या आरोपाखाली पोलिस कोठडीत डांबले. तेथे पोलिसांनीही लैंगिक अत्याचार केले. तत्पूर्वी, वयाच्या 11 व्या वर्षी झालेला विवाह आणि त्यानंतर पतीसह अन्य अनेकांकडून झालेला लैंगिक अत्याचार या घटना यासाठी कारणीभूत ठरल्या होत्या.
एक निरागस, निष्पाप मुलगी कुख्यात डाकू बनली. त्यासाठी समाजात खोलवर रुजलेली पुरुषप्रधान संस्कृती, खालच्या जातींकडे पाहण्याचा दृष्टीकोन कारणीभूत ठरले, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. खेळण्या बागडण्याच्या, शिक्षण घेण्याच्या वयात फुलन देवींचा विवाह लावून देण्यात आला. नंतर त्यांना अमानुष प्रसंगांना सामोरं जावं लागलं. चंबळच्या खोऱ्याचा विस्तार तीन राज्यांत झालेला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात हा डोंगराळ भाग पसरलेला आहे. चंबळच्या खोऱ्यातील डाकूंची सद्दी आता संपली आहे. या खोऱ्यात एकेकाळी खालच्या जातीतील महिलेची, म्हणजे फुलन देवी यांची दहशत होती.
फुलन देवींचा जन्म 10 ऑगस्ट 1963 रोजी उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील गोरहा का पुरवा गावात झाला. या भूमीतून यमुना आणि चंबळ नद्या वाहतात. हा भाग डोंगरदऱ्यांचा आहे. डाकूंसाठी हा प्रदेश सोयीचा मानला जातो. फुलन देवी यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्या मल्लाह जातीत जन्मल्या होत्या. जातीव्यवस्थेच्या उतरंडीत मल्लाह हे अत्यंत खालचा स्तर. मल्लाह जातीत जन्मलेल्यांना शूद्र समजलं जातं. मासेमारी हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. शेणाच्या गोवऱ्या थापण्याची त्या भागात पद्धत होती. फुलन देवी आणि त्यांच्या बहिणी हे काम करायच्या. गोवऱ्यांचा वापर इंधन म्हणून केला जायचा.
मूला या फुलन देवींच्या आई, तर वडिलांचे नाव देवीदिन. फुलन देवींना चार बहिणी आणि एक भाऊ. चुलते बिहारीलाल आणि चुलतभाऊ मइयादिन यांनी फुलन देवींची शेती हडप केली होती. यासाठी त्यांनी गाव पुढाऱ्याला लाच देऊन कागदपत्रांत फेरफार केला. त्यामुळं गावाच्या कडेला एका लहान घरात राहण्याची वेळ फुलन देवींच्या कुटुंबीयांवर आली होती. त्यांना गावातून हाकलून देण्याचा चुलत्याचा डाव होता. त्यावेळी फुलन देवींचं होतं अवघं दहा वर्षं. या वयातही फुलन देवींनी संघर्षाचा पवित्रा घेतला. चुलत्यानं हडप केलेल्या आपल्या शेतात त्यांनी ठिय्या मांडला. चुलत्यानं त्यांना धमकावलं, मात्र त्या घाबरल्या नाहीत. ती जमीन त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबीयांना परत मिळाली नव्हती.
या घटनेनंतर कुटंबीयांनी फुलन देवींचा विवाह करण्याचा निर्णय़ घेतला. तिपटीपेक्षा अधिक वयाच्या पुत्तीलाल याच्याशी त्यांचा विवाह लावून देण्यात आला. या बदल्यात पुत्तीलाल यांनी फुलन देवींच्या आई-वडिलांना 100 रुपये, एक गाय आणि सायकल दिली. तीन वर्षांनंतर फुलन देवी नांदायला जाणार, असे ठरले होते, मात्र पुत्तीलाल याने तीन महिन्यांतच त्यांना सासरी नेलं. शारिरीक संबंधांमुळं फुलन देवी आजारी पडल्या. आई-वडिलांनी त्यांना माहेरी आणलं, मात्र पतीला सोडून माहेरी राहणं त्या काळातील समाजाच्या दृष्टीने निषिद्ध होतं. त्यामुळं फुलने देवी यांना अन्य एका गावी नातेवाईकाकडे पाठवण्यात आलं. तेथे त्यांचे एका विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यामुळे त्या पुरुषाच्या पत्नीने फुलन देवी यांनी घराबाहेर काढलं.
आता माहेरी येण्याशिवाय फुलन देवी यांच्यासमोर पर्याय नव्हता. माहेरी आल्यानंतर सरपंचाच्या मुलाची त्यांच्यावर वाईट नजर पडली. फुलन देवी यांनी प्रतिसाद न दिल्यामुळं त्या मुलानं त्यांना मारहाण केली. त्यामुळं त्यांना पुन्हा सासरी जावं लागलं. दरम्यानच्या काळाच पुत्तीलालनं दुसरं लग्न केलं होतं. त्याची दुसरी पत्नी फुलन देवी यांच्याशी वाईट वागत असे. काही वर्षांनंतर पुत्तीलालनं फुलन देवींना घरातून बाहेर काढलं. त्यामुळं पुन्हा त्यांना आई-वडिलांकडे परत यावं लागलं. त्यानंतर मैयादीननं केलेल्या चोरीच्या खोट्या आरोपामुळं त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत राहावं लागलं. या तीन दिवसांत पोलिस कोठडीत पोलिसांनी त्यांच्याशी अमानुष व्यवहार केला, लेंगिक अत्याचारही केल्याचं सांगितलं जातं.
पोलिस कोठडीतून बाहेर आल्यानंतर कुख्यात डाकू बाबू गुर्जर यानं फुलन देवींचं अपहरण केलं. त्यानेही फुलन देवींवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केला.गुर्जर याचा साथीदार विक्रम मल्लाह याला दया आली आणि त्याने गुर्जरचा खून करून फुलन देवी यांची सुटका केली. न कळत्या वयापासून झालेल्या मानसिक, शारिरीक अत्याचारांचा बदला घेण्याची भावना त्यांच्या मनात उफाळून येत होती. भूतकाळ पूर्णपणे अंधकारात बुडालेला होता. मनात बदल्याची भावना घर करून बसल्यामुळे त्यांचं भविष्यही अंधकारमय दिसत होतं.
गुर्जर याच्या खुनानंतर त्याची टोळी विभागली गेली. एका टोळीचा म्होरक्या विक्रम मल्लाह बनला आणि गुर्जर याचा निकटवर्तीय लालाराम आणि त्याचा भाऊ दुसरी टोळी चालवू लागले. एके दिवशी लालारामनं डाव साधला आणि फुलन देवी यांचं अपहरण करून कानपूर जिल्ह्यातील बेहमई गावात नेलं. तेथे 21 दिवस त्यांना एका पडक्या वाड्यात निर्वस्त्र करून डांबून ठेवण्यात आलं. या 21 दिवसांत 22 जणांनी फुलन देवींवर आळीपाळीनं बलात्कार केला. 21 व्या दिवशी लालारामनं फुल देवांनी पूर्णपणे निर्वस्त्र अवस्थेत आडातून पाणी भरायला लावलं. याची माहिती मिळाल्यानंतर विक्रम मल्लाहनं साथीदारांसह मिळून फुलन देवींची सुटका केली आणि नंतर त्यांना बंदूक चालवायचं प्रशिक्षण दिलं. त्यानंतर फुलन देवीही त्याच्या टोळीत सामील झाल्या. बेहमई येथील अत्याचार फुलन देवींना स्वस्थ बसू देत नव्हता.
बेहमई गावात एका तरुणीचं लग्न होतं. ती तरुणी लालाराम याच्या कुटुंबातील होती. त्यामुळं लालाराम आणि त्याचा भाऊ लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता होती. दीड वर्षानंतर सूड उगवण्याची ही नामी संधी फुलन देवींकडे चालून आली होती. आपल्या साथीदारांसह फुलन देवी यांनी लग्नस्थळाला घेरलं आणि बंदुकीसह त्या घरात घुसल्या. लालाराम त्यांच्या हाती लागला नाही, पण त्यांनी 22 जणांना ताब्यात घेतलं. त्या 21 दिवसांत त्यांच्यावर आळीपाळीनं बलात्कार करणाऱ्या दोघांचा त्यात समावेश होता. सुडाच्या आगीनं पेटलेल्या फुलन देवी यांनी बेछूट गोळीबार केला आणि केवळ 7 सेकंदांच्या आत 22 जण ठार झाले. 14 फेब्रुवारी 1981 हा तो दिवस होता. या हत्याकांडामुळ उत्तर प्रदेश सरकारसह केंद्र सरकारही हादरून गेलं होतं.
फुलन देवी यांनी बदला तर घेतला, पण त्यानंतर ठाकुरांपासून त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला. उत्तर प्रदेश सरकारनंही त्यांना जिवंत किंवा मृत पकडण्याचे आदेश दिले होते. पोलिसांचं पथक त्यांच्या मागावर होतं. त्यामुळे फुलन देवी यांनी आत्मसर्पण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी मध्य प्रदेश निवडलं. उत्तर प्रदेश सरकारवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळं मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांच्यासमोर 1983 मध्ये त्यांनी आत्पसमर्पण केलं. 1994 पर्यंत त्या कारागृहात राहिल्या, 1994 मध्ये सुटका झाल्यानंतर राजकारणात प्रवेश कऱण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
मुलायमसिंह यादव यांनी फुलन देवी यांना समाजवादी पक्षात प्रवेश दिला आणि 1996 मध्ये मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या. समाजवादी पक्षावर त्यावेळी चहुबाजूंनी टीका झाली होती. शेखर कपूर यांनी 1994 मध्ये त्यांच्यावर बँडिट क्वीन हा चित्रपट तयार केला. त्यातील काही संवाद आणि दृश्यांवरून वाद झाला होता. वाईट रुढींच्या विरोधात लढणारी महिला, असं त्यांचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं. या चित्रपटामुळं फुलन देवी जगभरात पोहोचल्या. फुलन देवी यांनी 1994 मध्ये उमेद सिंग यांच्याशीची विवाह केला होता.
उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत बालविवाहाची प्रथा होती. फुलन देवी यांचाही बालविवाह झाला होता आणि त्यामुळं काय त्रास होतो, यातना होतात याची त्यांना जाणीव होती. त्यामुळं बंदूक उचलल्यानंतर त्यांनी सर्वात आधी आपल्या पहिल्या सासरी जाऊन पती पुत्तीलाल याची धुलाई केली होती. पुत्तीलालला झाडाला बांधून त्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यामुळे तो अर्धमेला झाला होता. त्यानंतर त्यांनी गावातील लोकांकरवी पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून बालविवाह रोखण्याची मागणी केली होती. यापुढे बालविवाह झाला तर बंदुकीची गोळी पोलिस अधीक्षकांचाच वेध घेणार, असा इशारा दिला होता. त्यानंतर सर्व जिल्ह्यांतील बालविवाह बंद झाले होते.
फुलन देवी या श्रीमंतांना लुटून गरीबांमध्ये वाटप करायच्या. त्यामुळे रॉबिनहूड अशी त्यांची प्रतिमा तयार झालेली होती. फुलन देवींनी जवळपास एक हजार मुलींचे विवाह लावून दिले होते. मिर्झापूर मतदारसंघातून मुलायमसिंह यांना तगडा उमेदवार हवाच होता. त्यामुळे त्यांनी फुलन देवींना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघातून फुलन देवी तीनवेळा निवडणूक लढल्या. दोनवेळा विजयी झाल्या, एकदा त्यांचा पराभव झाला होता.
ठाकूर समाजातील 22 जणांच्या हत्याकांडानंतर आपल्या जिवाला धोका निर्माण झाल्याची चाहूल फुलन देवी यांना लागली होती. त्यातूनच त्या सरकारला शरण गेल्या होत्या. पुढे 19-20 वर्षांनी त्यांची ही भीती खरी ठरली. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर एक वर्षाने म्हणजे 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. खासदार असतानाच 25 जुलै 2001 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. खासदार म्हणून त्यांना मिळालेल्या निवासस्थानाच्या बाहेर त्या शतपावली करत होत्या. त्यावेळी कारमधून आलेल्या तीन गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्या मृत्युमुखी पडल्या.
त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या तिघांपैकी एका आरोपीने तीन दिवसांनंतर डेहराडून पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. शेरसिंह राणा असे त्याचे नाव. फुलन देवी यांचा खून केल्याचं त्यानं कबूल केलं. बेहमई येथील 22 ठाकुरांच्या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठीच फुलन देवी यांना गोळ्या घातल्याचेही शेरसिंह राणा यानं पोलिसांना सांगितलं होतं.
फुलन देवी यांनी केलेल्या ठाकुरांच्या हत्याकांडाचं समर्थन केलं जाऊ शकतं का, हा वादाचा मुद्दा आहे. बहुतांश लोक या हत्याकांडाकडं फुलन देवींनी घेतलेला बदला या दृष्टीकोनातून पाहतात. फुलन देवी या एका वर्गासाठी पराक्रमी महिला आहेत. त्यांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेतला. फुलन देवी या खालच्या जातीतील होत्या. ठाकूर हे उच्चवर्णीय. खालच्या जातीतील लोकांना कोणकोणत्या अत्याचारांना सामोरं जावं लागतं, फुलन देवी या महिला आणि त्याही खालच्या जातीतल्या, त्यामुळे त्यांच्या काळात काय परिस्थिती होती, हा आणखी मोठा आणि वेगळा विषय आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.