सप्ताहात शनी-मंगळ प्रतियोग होत आहे. या योगामुळे या काळात हिंसाचार, जाळपोळ, बंद, निदर्शने होण्याची शक्यता असून, मोठे गुन्हेगार, दहशतवादी पकडले किंवा मारले जातील. या योगामुळे आगीच्या दुर्घटना, मोठे अपघात, भूकंप यांसारख्या घटनांमधून हानी संभवते.
रशिया, जपान यांच्याबरोबरच अमेरिका, आफ्रिका या प्रदेशात भूकंप, आगीच्या दुर्घटना, हिंसाचार, स्फोटक घटना यांमधून हानी संभवते. पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव या शहरांसह गुजरात, दक्षिण भारतात बंद, निदर्शने, हिंसाचार, जाळपोळ, धार्मिक-जातीय तणाव यांसारख्या घटना संभवतात. या काळात शेतकरी संघटना, कष्टकरी वर्ग, कामगार संघटनांचे बंद, निदर्शने, संप यांसारख्या घटना संभवतात.
अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने होतील. अनेक देश ट्रम्प आयात शुल्काविरोधात एकत्र येऊन बंडाच्या पावित्र्यात उभे राहतील. एकप्रकारचे व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्यता राहील. अन्य देशांशी होणाऱ्या करारांविषयी मोठा संभ्रम निर्माण होईल. शनी-मंगळ प्रतियोगामुळे काही देश पुन्हा युद्धाच्या पवित्र्यात उभे राहतील. रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा तीव्र होण्याची शक्यता राहील. काही देशांत दहशतवादी संघटना सक्रिय होऊन स्फोटक घटना, हिंसाचार घडविण्याचे प्रयत्न होतील. मोठे गुन्हेगार, दहशतवादी मारले जातील. हा काळ पोलिस, लष्कर, खेळाडूंसाठी प्रतिकूल असेल. पोलिस, लष्करावरील हल्ले, खेळाडूंच्या दुखापती, पराभव यांसारख्या घटना अनुभवास येतील.
राजकीय नेते, मंत्री यांचे राजीनामे, निलंबन, मृत्यू यांसारख्या घटना या काळात संभवतात. काही नेत्यांवर हल्ले, शाईफेक, आंदोलने होतील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या युती-आघाड्यांबाबत संभ्रम निर्माण होईल. संसदेमध्ये पावसाळी अधिवेशन मोठ्या गोंधळात पार पडेल. महत्त्वाचे विधेयक, कायदे यांविषयी गोंधळ होऊन गैरसमज पसरले जातील. विरोधकांच्या गोंधळामुळे महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यात अडथळे येतील. अनेक वेळा राज्यसभा, लोकसभा ठप्प होईल.
गुरू-शुक्र योगामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी पक्षांतील इनकमिंग मोठ्या प्रमाणावर होईल. मात्र, रवी-शनी षडाष्टक योग होत असल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले जाईल. सत्ताधारी पक्ष, मंत्री, प्रमुख नेत्यांवर मोठे आरोप होतील. काही प्रमुख नेते कायदेशीर कटकटींमध्ये अडकतील. पक्षचिन्ह, पक्षाच्या नावावर होणाऱ्या न्यायालयातील प्रकरणांच्या निकालाबाबत संभ्रम कायम राहील.
शनी-नेपच्यून योगामुळे शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होईल. बाजारात मोठे गैरव्यवहार-भ्रष्टाचार होण्याची शक्यता असून, मोठ्या व्यक्तीवर आरोप होतील. मात्र, सोन्या-चांदीतील तेजी कायम राहील. वस्त्र, अलंकार, वाहन, उंची वस्तू यांचे भाव वाढतील. या काळात हवेतील उष्णतेमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, पावसात खंड पडेल. काही प्रदेशात पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होईल. पिकांचे नुकसान संभवते. शनी-मंगळ प्रतियोगामुळे रेल्वे, विमान दुर्घटना होण्याची शक्यता राहील. हवेतील संसर्ग वाढून साथीचे विकार पसरण्याची शक्यता राहील. या काळात घरे, सोन्या-चांदीची दुकाने, बँका यांच्यावर दरोड्याच्या घटना अनुभवास येतील.
मात्र हा काळ लेखक, पत्रकार, प्रसारमाध्यमांसाठी अनुकूल असून, या क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव होईल. मोठ्या पदांवर वर्दी लागेल. साहित्य संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होईल.
मेष : सप्ताहाची सुरुवात मोठे इच्छा पूर्ण करणारी राहील. मित्र-सहकारी यांच्याकडून मोठी मदत मिळेल. नवीन मित्र-मैत्रिणी भेटतील. मात्र उत्तरार्धात अनावश्यक खर्च होतील.
वृषभ : नोकरी-व्यवसायात मोठे बदल होतील. गुरू-चंद्र शुभ योगामुळे प्रमोशन, मोठे पद मिळेल. चंद्र- शुक्र शुभ योगामुळे पगारवाढ होईल. वरिष्ठांशी संबंध सुधारतील.
मिथुन : सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक मंगलकार्य घडेल. गुरुजनांच्या गाठीभेटी होतील. धार्मिक-मंगल कार्यात सहभागी व्हाल. उत्तरार्धात नोकरी व्यवसायात कटकटी संभवतात.
कर्क : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक लाभ सहज होतील. उत्तरार्धात धार्मिक विधी, तीर्थयात्रा होतील. मात्र काही महत्त्वाची कामे विलंबाने होतील. गुरुजनांशी मतभेद, समज-गैरसमज टाळावेत.
सिंह : तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीच्या व्यवसायात मोठे लाभ होतील. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवास जपून करावेत. वारसा हक्क, पेन्शनसारख्या कामात अडथळे, विलंब, मनस्ताप संभवतो.
कन्या : नोकरीमध्ये चांगले बदल होतील. हाताखालच्या लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर विजय मिळेल. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास होतील. उत्तरार्धात वैवाहिक जीवनात असमाधान निर्माण होईल.
तूळ : शेअर्ससारख्या व्यवसायात लाभ होईल. प्रेमप्रकरणातील गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. उपासना, धार्मिक विधीतून आनंद मिळेल. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक : जागा, मालमत्तेच्या कामांतून मोठे लाभ होतील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरातील वातावरण आनंद देणारे राहील. मात्र, उत्तरार्धात मुलांची चिंता निर्माण होईल. शेअर्ससारख्या व्यवसायात पैसे अडकतील.
धनू : भावंडे-नातेवाइकांचा सहवास लाभेल. सहली, तीर्थयात्रा होईल. भावंडांचे विवाह जमतील. उत्तरार्धात जागा-मालमत्तेच्या कामात अडथळे संभवतात. कोर्टकचेरीमध्ये मनस्ताप संभवतो.
मकर : कुटुंबात चांगले वातावरण राहील. नोकरीमध्ये पगारवाढ होईल. नवीन नोकरीची संधी मिळेल. भाडे-कमिशन यांतून अर्थार्जन होईल. उत्तरार्धात भावंडे-नातेवाइकांकडून मनस्ताप संभवतो. नियोजित प्रवास रद्द होतील. मानसिक स्वास्थ्य खराब राहील.
कुंभ : मनासारख्या घटना घडतील. संतती सौख्य लाभेल. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. आरोग्यात उत्तम सुधारणा होईल. शेअर्ससारख्या व्यवसायात मन लाभ होईल. प्रेमप्रकरणात यश मिळेल.
मीन : परदेशगमनाची संधी मिळेल. व्हिसा/पासपोर्टची कामे होतील. उंची वस्तू, वस्त्र, अलंकार, प्रवास, मनोरंजन, पार्टी, सहली यांसाठी मोठे खर्च होतील. मित्रांसाठी खर्च होतील. ओळखीच्या व्यक्तींना मदत कराल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.