Amitesh Kumar : गुन्हेगारांना पोलिस आयुक्त अमितेश कुमारांचा सज्जड दम; 'एवढ्या' जणांची यादी काढली...
पुणे शहरात गेल्या काही दिवसांत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यासह खुनाच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. याविरोधात पोलिस आयुक्त अमितेश कुमार 'अॅक्शन' मोडमध्ये आले आहेत. शहरातील गुन्हेगारी नेस्तनाबूत करण्यात येईल. त्यासह गुन्हेगारांना 'ईंट का जबाब पत्थर से' देण्यात येईल, असा सज्जड दम पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
"शहरातील गुन्हेगारीच्या घटनांबाबत आम्ही आत्मपरीक्षण करू. पोलिस यंत्रणा संवेदनशील आहे. गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांची ( Police ) करडी नजर असून, सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येणार आहे. ‘ईंट का जबाब पत्थर से’, असे धोरण राबविण्यात येणार आहे," असं पोलिस आयुक्त यांनी सांगितलं.
"आंदेकर यांचा खून कौटुंबिक, संपत्तीचा वाद आणि पूर्ववैमनस्यातून झाला आहे. आंदेकर यांचा खून कट रचून करण्यात आला आहे. त्यासाठी आरोपींनी दीड वर्षापूर्वी परराज्यातून पिस्तूल खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. आंदेकर खून प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 111 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात येणार आहे. आंदेकर खून प्रकरणात 15 आरोपींना अटक केली आहे. अन्य तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हा गुन्हा गंभीर असल्याने अल्पवयीन आरोपींना सज्ञान ठरविण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे,’’ असं पोलिस आयुक्त यांनी म्हटलं.
आयटी कंपन्यांना दमबाजी केल्यास कारवाई
"आयटी कंपन्यांच्या परिसरातील काही व्यक्तींकडून हाउसकिपींग आणि वाहतुकीचे कंत्राट मिळविण्यासाठी कंपन्यांवर दबाव टाकण्याच्या घटना समोर आल्या आहेत. याबाबत चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आयटी कंपन्यांना दमबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल," असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
756 गुन्हेगारांची यादी तयार
गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गांजा आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोका, 'एमपीडीए'ची कारवाई झालेल्या, खून, खुनाचा प्रयत्न आणि कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या 756 गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येणार आहे," असं पोलिस आयुक्तांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.