Bihar News : प्रशासकीय सेवेत कर्तव्य बजावल्यानंतर अनेक सनदी अधिकाऱ्यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. लोकसभा निवडणुकीतही अनेक पोलिस अधिकारी राजकारणात आपले नशीब आजमावताना दिसत आहेत.
अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मैदान मारण्यासाठी डाव आखत आहेत. बिहारमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत (Bihar Lok Sabha Election 2024) अनेक पोलिस अधिकारी यापूर्वी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. त्यातील काही अधिकारी सध्या राजकारणात सक्रिय आहेत.
पाटण्याचे माजी वरिष्ठ पोलिस अधीक्षक बी.डी. राम हे उतरले आहेत. १९७३ च्या तुकडीतील ते 'आयपीएस' अधिकारी असून राम हे १९८० च्या दशकात वरिष्ठ पोलिस अधीक्षक होते. बिहारच्या विभाजनानंतर झारखंड वेगळे राज्य निर्माण झाल्यानंतर ते तेथील सेवेत रुजू झाले होते. बक्सरचे मूळ रहिवासी असलेले विष्णुदद्याल राम ऊर्फ बी.डी. राम हे झारखंडमधून लोकसभेची निवडणूक जिंकले होते. ते यावेळी पुन्हा निवडणूक लढवत नशीब आजमावत आहेत.
भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी निखिलकुमार हे सेवानिवृत्तीनंतर राजकारणात सक्रिय झाले होते. बिहारमधील औरंगाबादमधून लोकसभा निवडणुकीच्या त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. ते निवडून आले होते. निखिलकुमार यांचे वडील सत्येंद्र नारायण सिन्हा हे बिहारच मुख्यमंत्री होते. आई किशोरीसिन्हा आणि पत्नी श्यामासिंह याही खासदार होत्या.
पोलिस महानिरीक्षकपदावरील अधिकारी रामेश्वर उराव झारखंडच्या राजकारणात अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. ते सध्या झारखंड सरकारमध्ये वाणिज्यकर विभागाचे मंत्री आहेत. १९५६च्या तुकडीतील 'आयपीएस' अधिकारी ललित विजयसिंह यांनी सेवानिवृत्तीच्या काही दिवस आधी राजीनामा दिला होता. १९८९ मध्ये बेगूसरायमधून निवडणुकीला ते उभे राहिले आणि लोकसभेत पोहोचले. केंद्रातही ते मंत्री होते.
माजी पोलिस महासंचालक अशोककुमार गुप्ता यांनी बिहारमधील राष्ट्रीय जनता दलातून (आरजेडी) राजकारणात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. विचारवंत गटाचे अध्यक्ष या नात्याने 'आरजेडी'ची भूमिका सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवित असतात. माजी पोलिस महासंचालक डी.पी. ओझा, आशीष रंजन,सिन्हा आणि आर.आर. प्रसाद यांनीही निवडणुकीचा अनुभव घेतला आहे.
१९७२ च्या तुकडीतील 'आयपीएस' अधिकारी आशीष रंजन यांनी पोलिस महासंचालकपदावरुन निवृत्त झाल्यानंतर राजकारणात नशीब अजमाविले. डी.पी. ओझा यांनीही निवृत्तीनंतर बेगूसरायमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती. पण ते विजयी झाले नाही.
पाटण्यात १९९०च्या दशकात गुन्हेगारांवर वचक ठेवणारे १९८६ च्या तुकडीतील 'आयपीएस' अधिकारी माजी पोलिस अधीक्षक अजयकुमार यांनी राजकारणातही नावलौकीक मिळविला आहे. त्यांनी स्वतःचा पक्षही स्थापन केला होता. ते टाटानगरमधून खासदारपदी निवडून आले होते.सध्या ते काँग्रेसचे झारखंडमधील वरिष्ठ नेते अशी त्यांची ओळख आहे.
सेवानिवृत्तीनंतर अनेक राज्यांचे राज्यपाल म्हणून माजी पोलिस महानिरीक्षक डी.एन. सहाय यांनी जबाबदारी पार पाडली आहे. तमिळनाडूतील दोन माजी पोलिस महासंचालकांनी बिहारमध्धील राजकारणातून निवडणूक लढविण्याची आकांक्षा पूर्ण केली आहे. बी. के. रवी हे काँग्रेसचे तर करुणा सागर 'आरजेडी'चे सदस्य होते. पण यंदा या दोघांनाही संधी नाकारण्यात आली आहे.
माजी वरिष्ठ पोलिस अधीक्षक सुनीलकुमार विद्यमान हे देखील राजकारणात सक्रीय आहेत. ते बिहार सरकारमध्ये शिक्षण मंत्री आहेत. ते १९८८ च्या तुकडीतील 'आयपीएस' अधिकारी आहेत. सुनीलकुमार हे पाटण्यात १९९७ ते २००३ या कालावधीत वरिष्ठ पोलिस अधीक्षक होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.