
Maharashtra News : सरन्यायाधीशांच्या प्रोटोकॉलचा मुद्दा देशभर गाजत असतानाच गडचिरोलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहेरी तालुका मुख्यालयातही न्यायाधीशांना असुविधांचा सामना करावा लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चक्क दिवाणी न्यायाधीश चार दिवसांपासून बोअरमधील साप मेलेले दूषित पाणी पित होते. दूषित पाणी प्यायल्याने त्यांची प्रकृती बिघडली असून, शासकीय निवासस्थान सोडण्याची नामुष्की त्यांच्यावर आली.
अहेरी येथील दिवाणी न्यायालयाचे कनिष्ठ स्तरावरील न्यायाधीश शाहीद साजीदुजम्मा एम. एच. यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या बोअरवेलच्या आजूबाजूला काहीतरी सडल्यासारखा वास येत होता. सुरुवातीला त्यांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र, सलग तीन दिवस हा वास सहन करत असताना त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय तपासणीदरम्यान पाण्यामधून संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली.
त्यानंतर न्यायाधीशांच्या घरामागील बोअरवेलची तपासणी करण्यात आली. यावेळी बोअरवेलमध्ये मृत साप सडलेल्या अवस्थेत असल्याचं समजलं. बोअरमध्ये साप मृत झाला असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी दिवसभरासाठी निवासस्थान सोडले.
दरम्यान न्यायाधीश शाहीद साजीदुजम्मा यांनी यासंदर्भात अहेरी नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी न्यायाधीशांना प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी आलापल्ली येथील एका खासगी व्यक्तीला बोलावून बोअरवेलमधून तो सडलेला साप बाहेर काढायला लावला. तेव्हा मर्सिबल मशीन बाहेर काढले असता, तिथे साप अडकून मेल्याचे आढळले.
न्यायाधीशांच्या तक्रारींकडेच दुर्लक्ष केलं जात असेल आणि प्रशासनाकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल, हे विचारायलाच नको, अशी भावना न्यायाधीश शाहीद साजीदुजम्मा यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात आलेल्या बी. आर. गवई यांनी राज्यातील अधिकाऱ्यांकडून राजशिष्टाचार पाळला न गेल्याने नाराजी व्यक्त केली होती. गवई यांच्या स्वागतासा महाराष्ट्राच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अनुपस्थित होते. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सरन्यायाधीश गवईंनी याचिका दाखल करणाऱ्या वकिलाला दंड ठोठावला होता. पण, लोकशाहीचे महत्वाचे अंग असलेल्या संस्थेचे प्रमुख म्हणून सरन्यायाधीश पदाची गरिमा राखली जावी असं सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं. हे प्रकरण ताजं असतानाच गडचिरोलीतून न्यायाधीशांबाबत पुन्हा हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने त्यासंदर्भात चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.