Kolhapur News : मतमोजणीवेळी ऊन अन् पावसाचा अंदाज घेऊन तयारी करा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Kolhapur Lok Sabha Election 2024 : 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात दोन्ही लोकसभा मतदारसंघातील नोडल अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली.
kolhapur collector amol yedge meeting
kolhapur collector amol yedge meeting sarkarnama

Kolhapur News, 21 May : कोल्हापूर ( Kolhapur ) आणि हातकणंगले ( Hatkanagale ) लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी कसबा-बावडा येथील रमणमाळा येथे तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी राजाराम तलाव येथे पार पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नियोजन बैठक आढावा घेत सर्वांना दहा दिवस अगोदर तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतमोजणी वेळी उष्णता, उकाडा आणि पावसाचा अंदाज घेऊनच संपूर्ण तयारी करा, अशा सूचना ही देण्यात आल्या आहेत.

4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात दोन्ही लोकसभा मतदारसंघातील नोडल अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मतमोजणीवेळी उकाडा, पाऊस आदीबाबत विचार करून नियोजन करा. मतमोजणीसाठी नेमलेले अधिकारी कर्मचारी यांना मतमोजणी प्रक्रियेत कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्या. तयारीसाठी आपल्याकडे दहा दिवस आहेत. परंतू सर्व कामे 25 मे पर्यंत पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर-47 व हातकणंगले-48 लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी अनुक्रमे रमणमळा व राजाराम तलाव येथे होणार आहे. येथील सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, आवश्यक वैद्यकीय सुविधा, नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अल्पोपहार जेवण, माध्यम कक्ष आदीबाबत नियोजनाच्या अनुषंगाने यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे यांनी माहिती दिली.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांनी मतमोजणी करताना सध्याच्या तापमानाचा विचार करून पंखे, कूलर आदी व्यवस्था वेळेत उभारणी करा, नागरिकांसाठी मतमोजणीचे निकाल स्क्रीनवरती पाहता येतील, अशा ठिकाणी आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार उभारण्याच्या सूचना दिल्या. मतमोजणी केंद्रातील सर्वसाधारण नियंत्रण, नियंत्रण कक्षाचे व्यवस्थापन, केंद्रातील टेबल मांडणी, दिशादर्शक व सूचनांचे फलक लावणे व मतमोजणी केंद्र परिपूर्ण स्वरूपात तयार करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

मोबाईलला बंदी -

वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणालाही मतमोजणी कक्षात मोबाईल नेण्यास बंदी असणार आहे. इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आपले मोबाईल कम्यूनिकेशन कक्षात किंवा व्यवस्था केलेल्या इतर ठिकाणी ठेवावे लागणार आहेत. तसेच, माध्यम प्रतिनिधींनाही मतमोजणी केंद्रात जाताना मोबाईल माध्यम कक्षात ठेवावे लागणार आहेत. आयोगाच्या सूचनेनूसार माध्यम प्रतिनिधींनी फक्त कॅमेरावरून सुविधा केलेल्या ठिकाणाहूनच छायाचित्रण किंवा छायाचित्र काढण्याची मुभा असणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com