Mumbai Metro Scam : यह तो 'ट्रेलर' है! IAS रुबल अग्रवाल यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना खडसावलं...

Rubal Agrawal & Maha Mumbai Metro : टेंडर हे ऑपरेशन विभागामध्ये मनुष्यबळ पुरविण्यासाठी काढण्यात आले होते. त्यांचे बिल मात्र एचआर विभागामार्फत अदा करण्यात येत होते. यातच कुठे तरी पाणी मुरत असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.
Rubal Agrawal
Rubal AgrawalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई मेट्रोचा कारभार हाती घेतल्यानंतर पहिल्या दीड महिन्यांतच मेट्रोच्या मॅनेजिंग डायरेक्टर रुबल अग्रवाल यांनी व्यवस्थेला ‘स्पीडअप’ केले आहे. प्रवाशांना तिकीट सेवा पुरविणाऱ्या यंत्रणांना सरळ केल्यानंतर अग्रवाल यांनी थेट मेट्रोतील ‘एचआर’ विभागातील महाव्यवस्थापक राहुल अहिरे यांना चांगलाच धडा शिकविला. मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपनीच्या नावाने वाढवून बिले काढल्याने अहिरेची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपनीचे मूळ कंत्राट, अपेक्षित काम, त्याचा आर्थिक मोबदला, प्रत्यक्षातील बिले याबाबत ‘इन्व्हेस्टिगेशन’ करून रुबल अग्रवाल यांनी अहिरे यांच्याकडची जबाबदारी काढून घेतली. त्याचवेळी अहिरेंना ‘मॅनेज’ करून जादा पैसे घेतलेल्या कंपनीलाही ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

रुबल अग्रवाल यांनी मुंबईकरांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या अधिकारी आणि कपंनीवर मोठी कारवाई करून इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिस्तीत राहण्याचा इशाराच दिला आहे. मेट्रोची फसवणूक करणाऱ्यांना व्यवस्थेतून बाजूला करण्याची तंबीच त्यांनी दिली आहे. म्हणजे, ही कारवाई आता केवळ ‘ट्रेलर’ असून, पिक्चर अभी बाकी है ! असेच रुबल अग्रवाल यांनी दाखवून दिले आहे.

मुंबई मेट्रोमध्ये डी. एस. एंटरप्रायजेस या संस्थेस सुमारे 500 इतके मनुष्यबळ पुरविण्याबाबतचे कंत्राट देण्यात आले होते. त्यापैकी 10 टक्के मनुष्यबळाचा पुरवठा कमी होत असला तरी मोबदला मात्र 100 टक्के देण्यात येत होता.

हा गैरप्रकार 'एमएमआरडीए'चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या लक्षात आला. त्यांनी ही बाब पत्राद्वारे महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका रुबल अग्रवाल यांना कळवला. त्यानुसार केलेल्या प्राथमिक तपासात राहुल अहिरे हे दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

आता या घोटाळ्याच्या सखोल चौकशी मेंटेनन्सचे संचालक प्रवीण गाजरे करत आहेत. ते एच.आर., ऑपरेशन आणि फायनान्स विभागाची चौकशी करत आहेत. यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेतही महा मुंबई मेट्रोकडून मिळत आहेत.

दरम्यान, टेंडर हे ऑपरेशन विभागामध्ये मनुष्यबळ पुरविण्यासाठी काढण्यात आले होते. त्यांचे बिल मात्र एचआर विभागामार्फत अदा करण्यात येत होते. यातच कुठे तरी पाणी मुरत असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

मुंबई मेट्रो तोट्यात असल्याचे कारण देऊन रिलायन्स मोकळे झाल्याने ही सेवा आता ‘एमएमआरडीए’कडे आहे. मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ करून ती अधिक गतीमान करण्याच्या उद्देशाने शिंदे-फडणवीस-पवार सरकारने ‘आयएएस’ अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर रुबल अग्रवाल यांच्याकडे मेट्रोच्या मॅनेजिंग डायरेक्टर’ची जबाबदारी देण्यात आली.

या सेवेसाठी पहिल्यांदाच ‘आयएएस’ची नेमणूक करण्यात आली. त्यातूनच गेल्या दीड-पावणेदोन महिन्यांत रुबल अग्रवाल यांनी मेट्रोच्या व्यवस्थेत बदल करण्याचा भर दिला. त्याचाच भाग म्हणून मनुष्यबळ वाढविण्याचा त्यांचा हेतू असतानाच, अहिरे आणि संबंधित कंपनीने मेट्रोची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

आता उघडकीस आलेल्या प्रकारानंतर मेट्रोच्या सर्वच विभागांतील कामाचे ऑडिट केले जात आहे. त्यातील अडचणी दूर करून मेट्रो व्यवस्थेला वेग देण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. तसेच व्यवस्थेत राहून बेजबाबदार आणि कामांत टाळाटाळ करणाऱ्यांना बाजूला करण्याचे धोरणही राबवल्याचे आता स्पष्ट होत आहे. त्यात आता कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही, हेच यापुढील काळात दिसणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com