Pune Lok Sabha: मतदानापूर्वी निवडणूक आयोगाने घेतले 'हे' तीन महत्त्वपूर्ण निर्णय

Pune Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यांमध्ये उद्या पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाने काही निर्बंध घातले आहेत. ते जाणून घेऊ या.
Pune Lok Sabha Election 2024
Pune Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Pune Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यांमध्ये उद्या पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाने काही निर्बंध घातले आहेत. त्यानुसार आठवडे बाजारांवरती बंदी घालण्यात आली असून मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जाहीर करण्यात आले आहेत. तसेच मतदान कार्ड नसल्यास बारा पुरावे ग्राह्य धरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आला आहे.

मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी येत्या 13 मे रोजी पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये निर्गमित करण्यात आले असून याद्वारे सर्व वाणिज्यिक आस्थापना, सर्व मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस फोन, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर विद्युत उपकरणे तसेच चिन्हांचे प्रदर्शन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे, मावळ व शिरुर लोकसभा (Pune, Maval and Shirur Lok Sabha) मतदारसंघात 13 मे रोजी सकाळी 6 वाजेपासून मतदान संपेपर्यंत मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मतदारांव्यतिरिक्त प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील तरतूद व भारतीय दंड विधान कायद्याचे कलम 188 नुसार दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहतील, असेही डॉ. दिवसे यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार बंद

पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत. मुंबई मार्केट अ‍ॅण्ड फेअर अ‍ॅक्ट 1862 चे कलम 5 अन्वये हे आदेश जारी करण्यात आले असून मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मावळ तालुक्यातील टाकवे बु., शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील वेल्हे, आंबेगाव तालुक्यातील धामणी, लाखणगाव, नागापूर, महाळुंगे पडवळ व तिरपाड, खेड तालुक्यातील कुरकुंडी, शिरूर तालुक्यातील केंदूर, तळेगांव ढमढरे, वडगांव रासाई व संविदणे या ठिकाणचे आठवडे बाजार 13 मे रोजी बंद राहतील. या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास मुंबई मार्केट फेअर अ‍ॅक्ट1862 मधील तरतुदीनुसार दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मतदार ओळखपत्र नसल्यास निश्चित केलेले 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य

मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास अन्य 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr. Suhas Divase) यांनी दिली आहे. फोटोसह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

Pune Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024: साध्या माणसाविरोधात विश्वनेत्यांना सभा घ्यावी लागली, रोहित पाटलांची टोलेबाजी

पुढील 12 पुरावे ग्राह्य

पासपोर्ट, वाहन ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com