पुणे : म्हणतात ना जिद्द असेल तर, परिस्थितिही गुडघे टेकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बीड (Beed) जिल्ह्यातील पांगरा या गावचा ऊसतोड कामगार मुलगा व ऊसतोड कामगार म्हणून स्वत: काम केलेले भुजंग मिसाळ (Bhujang Misal) यांचे आहे. भुजंग यांची नुकतीच विक्रीकर निरीक्षक (STI) म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे कौतूक सर्वच स्तरातून होत आहे. (MPSC) (Bhujang Misal News)
भुजंगचे वडील पांडुरंग मिसाळ हे पुण्यातील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोड काम करतात. भुजंगनही वडीलांसोबत ऊसतोडीचे काम केले. वडील सतत उसतोडीकरीता घर सोडून बाहेरगावी जात असल्याने भुजंगला आपले शिक्षण आपल्या नातेवाईकांच्या घरी राहून करावे लागले. प्राथमिक शिक्षण हे (ता. आष्टी, बीड ) येथे मामाकडे तर उच्च माध्यमिक शिक्षण शिरूर (ता. शिरुर, जि. बीड) येथे मावशीच्या घरी राहून पूर्ण करावे लागले. पुढे शिक्षणाची सोय नसल्याने त्यांच्या पुढील शिक्षणाला ब्रेक लागला. मात्र, भुजंगने हार न मानता वडिलांबरोबर तीन वर्ष ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा (ता.नेवासा,जि.नगर) येथे ऊस तोडणी करून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करत पदवी मिळवली. (MPSC motivational story in Marathi)
पुढे काय करायचे हे माहित नव्हते तेव्हा त्यांच्या कुंटुबांने पुणे परिसरात काम करायचा निर्णय घेतला. त्यानुसार ते संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कासारसाई दारुंब्रे येथे ऊसतोड करण्यासाठी आले. त्यावेळी एका मित्राकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा मार्ग भुजंगला सापडला अन् त्याने आपले प्रयत्न सुरू केला. अखेर सहाव्या प्रयत्नात त्याने यश संपादन केले असून विक्रीकर निरीक्षक म्हणून भूजंगची निवड झाली आहे. यामुळे पालकांचे स्वप्न साकार झाले.
भुजंग आपल्या या खडतर प्रवासाबद्दल सांगतात की, या काळात अनेकांनी मला साथ दिल्यामुळेच मी हे यश संपादन करू शकलो. पदवी मिळाल्यावर मित्रांबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (MPSC) देणे सुरु केले. तेव्हा अनेक समस्येला तोंड द्यावे लागले होते. या परिक्षेत आतापर्यंत पाच वेळा थोड्या मार्कावरुन संघी गेली होती. तरीही हिंमत न हारता लढत राहीलो. अपयश येत असल्याने आपल्या चुका शोधत अभ्यास पद्धतीत बदल करून पुन्हा परीक्षा देणे सुरुच ठेवले. दिवसभर ऊसतोडणी करायची अन् रात्री उशिरापर्यंत कारखानास्थळी झोपडी समोरील रस्त्यालगतच्या विजेच्या दिव्यावर अभ्यास करणे सुरूच होते. मात्र, या काळात मित्रांनी मला पुण्यात राहण्याचा आग्रह केला आणि कुटुंबाने व मित्रांनी आर्थिक मदत पुरवली. यामुळेच हे यश मिळवणे मला सोपे गेले, असे भुजंगने सांगितले.
दरम्यान, भुजंग यांच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमुख साधन हे ऊसतोड करून मिळणारी मजुरी हे आहे. वर्षातील सहा महिने कुटुंबाचे वास्तव्य साखर कारखानास्थळी ऊसाच्या पाचटापासून तयार केलेल्या झोपडीत जाते. तर, उर्वरित सहा महिने गावाकडे मिळेल ती मजुरी करावी लागते. भुजंगच्या या यशाचे सर्वत्र कौतून होत असून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही ट्वीटर व फेसबुकच्या माध्यमातून भुजंगचे कौतूक केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.