पुणे: शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) घोटाळा (scam) प्रकरण समोर आल्यापासून राज्यात रोज नवे घोटाळे उघडकीस येत आहेत. टीईटी परीक्षा घोटाळा समोर आल्यानंतर याच प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीईटी परीक्षेत अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 उमेदवारांना पैसे घेऊन परीक्षेत पास केल्याची माहिती सायबर पोलिसांच्या (Cyber Police) तपासात निष्पन्न झाली आहे.
2019-20 मध्ये झालेल्या परीक्षेत एकूण 16 हजार 592 परीक्षार्थींना पात्र करण्यात आले. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकालाची पडताळणी केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली. तर 2018 मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी सुरू असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यानंतर त्यातील तब्बल 7 हजार 800 उमेदवार अपात्र ठरल्याचं निष्पन्न झालं. तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 13 फेब्रुवारी 2013 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, राज्यभरातील सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच. जे शिक्षक प्रमाणपत्र सादर करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिला होता. त्याबाबत, राज्यभरातील सर्व शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनाही याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या.
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe), माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली. त्यानंतर पुणे पोलीसांनी या प्रकरणात पैसै घेणाऱ्या दलालांच्या शोधात आहेत. जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमारने तपासादरम्यान पोलीसांना अभिषेक सावरीकरनं पाच कोटी दिल्याची कबुली दिल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला होता. त्यानंतर आता ज्या परीक्षार्थीकडून पैसे घेतले त्यांचाही शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.