शिवसेना ( शिंदे गट ) खासदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास बक्षीस घोषित केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. याप्रकरणी आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, महायुतीत वादग्रस्त विधानं करण्यासाठी चढाओढ सुरू झाली का? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण, भाजप खासदारानं आता राहुल गांधींवर विखारी शब्दांत टीका केली आहे.
"राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा योग्य नाही. त्यांच्या जीभेला चटके दिले पाहिजेत," असं खळबळजनक विधान खासदार अनिल बोंडे ( Anil Bonde ) यांनी केलं आहे. खासदार बोंडे हे सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता राहुल गांधींच्या जीभेल चटके देण्याची भाषा केल्यानं राजकारण तापणार आहे.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी, "देशात अनुकूल सामाजिक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण रद्द करण्याचा विचार करू," असं विधान केले होते. यावरून भाजप, बहुजन समाज पक्ष, शिवसेना आणि भाजपच्या इतर काही मित्रपक्षांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला होता.
अनिल बोंडेंनी काय म्हटलं?
"संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची भाषा केली, ती योग्य नाही. परंतु, राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले, तेही भयानक आहे. त्यामुळे परदेशात जाऊन कोणी वात्रटासारखं बोलत असेल, तर जीभ छाटू नये, जीभेला चटके दिले पाहिजेत. त्यात मग राहुल गांधी, ज्ञानेश महाराव किंवा श्याम मानव असो. भारतातील बहुसंख्याकांच्या जे भावना दुखावतात. त्या लोकांना कमीत-कमी जाणीव करून दिली पाहिजेल," असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
संजय गायकवाड काय म्हणाले?
संजय गायकवाडांनी म्हटलं, "महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मागासवर्गीय, आदिवासी आणि अन्य प्रवर्गातील लोकांना आरक्षण दिलं. मात्र, राहुल गांधींनी विदेशात जाऊन, 'माझ्या देशातील आरक्षण संपवायचं आहे,' असं विधान केलं. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असून राहुल गांधींनी त्यांच्या पोटातील मळमळ बाहेर ओकली,"
"लोकसभा निवडणुकीत संविधान धोक्यात आहे, असा फेक नरेटिव्ह सेट करून काँग्रेसनं मते घेतली. आज ते आरक्षण संपविण्याची भाषा करू लागले आहेत. 100 टक्के काँग्रेसला मागासवर्गीय, ओबीसी आणि आदिवासींचं आरक्षण संपवायचं आहे. राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देईल," असं विधान संजय गायकवाड यांनी केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.