
Pune News : पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची (भाजप) पकड मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे दौंडचे आमदार राहुल कुल यांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात मोठा राजकीय धक्का बसला आहे. महायुतीतील सहकारी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी चाणाक्ष डाव खेळला आहे.
काही दिवसांपूर्वी माजी आमदार रमेश थोरात यांना पक्षात सामील करून घेत अजित पवारांनी पहिली मोठी खेळी खेळली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी दौंड तालुक्यात आपली राजकीय ताकद दाखवत भाजप आणि राहुल कुल यांना दुसरा मोठा धक्का दिला आहे.
येत्या 17 ऑक्टोबर रोजी दौंड शहर आणि तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. याबाबत माजी भाजप (BJP) शहराध्यक्ष स्वप्नील शहा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी शहा यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. स्वप्नील शहा यांच्या राजीनाम्याने दौंडमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती.
सुरुवातीला त्यांच्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, माजी आमदार रमेश थोरात आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विरवधल जगदाळे यांच्या मध्यस्थीने शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वप्नील शहा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत राहुल कुल Rahul kul यांचे निकटवर्तीय नंदू पवार आणि इतर अनेक स्थानिक पदाधिकारीही राष्ट्रवादीत सामील होणार आहेत.
“भाजपमधील एकतर्फी आणि मनमानी कारभारामुळे आम्ही नवीन राजकीय मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आहे. मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो, पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्पित कार्यकर्ता म्हणून काम करेन,” असे स्वप्नील शहा यांनी स्पष्ट केले. तसेच, “आगामी दौंड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत,” असेही त्यांनी नमूद केले.
दौंड शहरात मागील विधानसभा निवडणुकीत राहुल कुल यांना मिळालेल्या प्रचंड मताधिक्यात स्वप्नील शहा आणि नंदू पवार यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराने कुल यांच्या गटात चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना, भाजपसाठी हा मोठा राजकीय धक्का ठरण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.