Pune Politics News : राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विविध विकासकामांसाठी मागणी केलेल्या हजारो कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देत त्यासाठी निधीची घोषणा केली. त्यात त्यांचे कट्टर समर्थक मावळचे आमदार सुनील शेळके यांना 429 कोटी रुपयांची बंपर लॉटरी लागली.
2019 पर्यंत भाजपमध्ये असलेले सुनील शेळके यांना राष्ट्रवादीत आणून अजितदादांनी त्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट दिले. या संधीचे त्यांनी सोने केले. मोदी लाटेत त्यांनी भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांची मावळातून आमदार होण्याची हॅट्ट्रिक चुकविली. त्यांचा दणदणीत पराभव केला. त्यानंतर प्रत्येक अधिवेशनात त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली. दरम्यान, राज्यात गेल्यावर्षी जूनमध्ये सत्तापालट झाला. राष्ट्रवादी असलेल्या आघाडीची सत्ता जाऊन पुन्हा भाजप आणि शिंदे शिवसेना सत्तेत आली. त्यानंतर गेले वर्षभर मावळातील विकासकामांना ब्रेक लागला होता. मंजूर झालेल्या कामांचा निधीही रखडला होता.
दरम्यान, यावर्षी जुलैला राष्ट्रवादीतील अजित पवारांचा गट राज्यातील युतीच्या सत्तेत सहभागी झाला. शेळके हे दादांबरोबर राहिले. दादा हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाल्याने शेळकेंची एक्स्प्रेस पुन्हा सुसाट धावू लागली आहे. त्याचा प्रत्यय नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आला. मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यांत त्यांच्या वाट्याला 429 कोटी रुपयांचा निधी आला. त्यात मावळ तालुक्यातील आंदर मावळातील मुख्य रस्ता कान्हे फाटा- टाकवे-वडेश्वर-कुसूर- खांडी-सावळा रस्ता सुधारणा करण्यासाठी 336 कोटी रुपये मंजूर झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
429 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल अजितदादांसह दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शेळके यांनी मावळच्या जनतेच्या वतीने आज आभार मानले. आंदर मावळातील 43 किलो मीटरचा मुख्य रस्ता आता प्रशस्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे दळणवळणास गती मिळून पर्यटनास चालना मिळणार आहे. मावळ तालुक्यातील औद्योगिक, पर्यटन व ग्रामीण भागातील दळणवळणाच्या दृष्टीने आवश्यक असणारे महत्त्वाचे रस्ते, दुर्गम भागाला जोडणारे रस्ते, नदीवरील पूल आणि सक्षम आरोग्य व्यवस्था यासाठी निधी उपलब्ध झाल्याने मावळच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच गती मिळणार आहे, असे सुनील शेळके म्हणाले.
Edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.