Pune News: मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे.उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांकडून जल्लोष,तर तिकीट कापलेल्या उमेदवारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तिकीटासाठी ऐनवेळी पत्ता कट झाल्यानंतर नाराजांनी मिळेल त्या मार्गानं आपला रोष व्यक्त करतानाच,पक्षांतराचा किंवा अपक्ष अर्ज दाखल करण्याचा मोठा निर्णय घेतानाही मागचा पुढचा विचार केला नाही.
तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (Ajit Pawar NCP) तुरुंगात असलेल्या आंदेकर कुटुंबातील दोन जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावरुन टीकेची झोड उठवली जात असतानाच भाजपनेही त्याच वाटेवर पाऊल ठेवत गुंड शरद मोहोळच्या पत्नीला उमेदवारी दिल्याचं समोर येत आहे. भाजपच्या या एका निर्णयानंतर पुण्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे.
भाजपकडून पुणे महानगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक 11 मधून स्वाती मोहोळ यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. स्वाती मोहोळ या कुख्यात गुंड शरद मोहोळच्या (Sharad Mohol) पत्नी आहेत. त्यांनी रामबाग कॉलनी आणि शिवतीर्थनगर परिसरातून भाजपच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या वर्षी शरद मोहोळची टोळीयुद्धातून राहत्या घराजवळच हत्या झाली होती.
शरद मोहोळ यानेही तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सामाजिक व राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसून आलं होतं. आता मोहोळच्या हत्येनंतर त्याच्या पत्नीला भाजपनं पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरवलं आहे. शहरात एकीकडे वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता भाजपच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या कुख्यात गुंड बंडू आंदेकरांच्या कुटुंबातील दोन जणांना एबी फॉर्म दिला असल्याची माहिती आहे.तसेच आंदेकर कुटुंबातील दोन जणांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.पण यामुळं आणखी एक खळबळजनक उमेदवारी जाहीर झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गजा मारणेच्या पत्नीसह आयुष कोमकर हत्याप्रकरणातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळालेली उमेदवारी देण्याच्या निर्णयावर टीकेची झोड उठवली जात आहे.त्याचदरम्यान,तसेच राष्ट्रवादीकडून आणखी एका गुन्हेगाराला उमेदवारी देण्यात आली असून कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायरलाही प्रभाग क्रमांक 39 मधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तो शिवसेनेच्या दिपक मारटकर हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांतील व्यक्तींना उमेदवारी दिल्याचं समोर येताच सोशल मीडियावर संतापाची तीव्र लाट उसळली आहे.पण कडक शिस्त,कार्यकर्त्यांची कदर करणारा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपनेही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीच वाट धरल्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.