चैतन्य मचाले :
Pune News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका सर्वांना माहीत आहे. त्यांनी एकदा कार्यक्रमासाठी वेळ दिली की मग त्यावेळेस ते तिथे असणार हे ठरलेले असते. भले मग ती पहाटेची वेळ असो अथवा रात्रीची. अजित पवार तेथे जाणार हे नक्कीच.
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना अनेकदा सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध विकास कामांचा आढावा अजित पवार यांच्याकडून घेण्यात येत होता. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर अजितदादांकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आली. तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपद आल्याने पुणे शहरात अजितदादांच्या सकाळपासून सुरू होणाऱ्या आढावा बैठका कमी झाल्या होत्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काही महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारला पाठींबा जाहीर करत अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आल्यास दिवाळीच्या काळातच पुन्हा शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळपासून बैठका सुरू होतील, अशी भीती सरकारी अधिकाऱ्यांना वाटत होती. पण दिवाळीच्या अगोदरच त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी आली.
मात्र, ते डेंगीने आजारी पडल्याने त्यांना घराबाहेर पडता येत नव्हते. डेंगीतून बरे होताच अजित पवारांनी शनिवारी संपूर्ण दिवसभरात विविध विकासकामांची पाहणी करत अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पुणे मेट्रो, ससून हाँस्पिटल, राज्य सरकारच्यावतीने नव्याने उभारण्यात येणाऱ्या सरकारी कार्यालयांच्या इमारतींच्या कामांची पाहणी करून पालकमंत्री पवार यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील त्यांच्या स्मृतीस्थळाला सकाळी सात वाजता अभिवादन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी कामाला सुरूवात केली. त्यानंतर आठच्या सुमारास पुण्यात दाखल होत उपमुख्यमंत्री पवार यांनी सारथी मुख्यालय, शिक्षण मुख्यालय, कामगार भवन, प्रस्तावित कृषी भवन या वास्तूंची पाहणी केली.
पवार सकाळीच इमारतींच्या कामाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर अधिकारी सकाळी सात वाजल्यापासूनच पाहणीच्या ठिकाणी हजर होते. त्यानंतर दुपारी ससून हाँस्पिटल तसेच त्यानंतर संध्याकाळी सिव्हिल कोर्ट येथील पुणे मेट्रो प्रकल्पाची पाहणी करत पालकमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत आवश्यक त्या सूचना दिल्या.
सकाळपासून विकास कामांची पाहणी करण्यामध्ये पवार यांना उशीर झाल्याने वडगावशेरी विधानसभा मतदारासंघातील कोर्ट, जमाबंदी आयुक्त कार्यालय तसेच महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने उभारण्यात येणारे निवासस्थाने ही कामे पाहून त्यावर सूचना देण्यास पवार यांना वेळ मिळाला नाही. उशीर झाल्याने ही कामे आता पुढील आठवड्यात पाहण्याचे आश्वासन देऊन उपमुख्यमंत्री पवार पुढील नियोजित कार्यक्रमासाठी गेले, असे आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.