पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात (NCP) आल्यानंतर आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था निश्चितपणे होणार नाही.आपण पक्षाचे काम नेटाने करा.भावाच्या नात्याने मी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीन,असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज रूपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombare) तसेच त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व महिला कार्यकर्त्यांना दिला.
पाटील-ठोंबरे यांनी आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.पाटील-ठोंबरे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच्या सदस्य आहेत.पुणे महापालिकेत मनसेच्या नगरसेविका म्हणून त्यांनी काम केले आहे.मनसेच्या त्या राज्य उपाध्यक्ष होत्या.दोन दिवसांपूर्वी पाटील-ठोंबरे यांनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘‘ रूपाली पाटील-ठोंबरे या लढाऊ कार्यकर्त्या आहेत.त्यांनी केलेली आंदोलने मी पाहिलेली आहेत. त्यांचा व त्यांच्यासोबत पक्षाच्या प्रवेश केलेल्या सर्व सहकाऱ्यांचा पक्षात सन्मान केला जाईल. महिलांना ताकद देऊन राजकारणात मानाचे स्थान देण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धोरण आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सुरवातीपासूनच ही भूमिका राहिली आहे. शरद पवार यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरवातीला ३३ टक्के व नंतर ५० टक्के आरक्षणाचा निर्णय झाला. त्यामुळे महिलांना सत्तेत मानाचे स्थान मिळाले. परिणामी खासदार वंदना चव्हाण यांना पुण्याचे महापौरपद, अनिता फरांदे यांना पिंपरीचे महापौरपद तर योगिता कोकरे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद एकाचवेळी मिळू शकले.पक्षाच्या या धोरणामुळेच खासदार चव्हाण, सुप्रिया सुळे, रूपाली चाकणकर, या राजकारणात पुढे जात राहिल्या आहेत. या साऱ्यांप्रमाणेच रूपाली पाटील-ठोंबरे यांना भावानाच्या नात्याने सर्वतोपरी मदत कण्याची माझी भूमिका राहील.’’
पक्ष बदलला तरी सामान्य माणसासाठी काम करण्याची भूमिका कायम राहील,अशी भावना रूपाली पाटील-ठोंबरे यांनी व्यक्त केली. पालकमंत्री या नात्याने कामानिमित्त अजित पवार यांना भेटले तरी अजित पवारांना वारंवार का भेटते असा माझ्याबाबत पक्षातून आक्षेप घेतला जात होता, असे पाटील-ठोंबरे यांनी सांगितले. यापुढच्या काळात सर्वसामान्यांची कामे अधिक जोमाने करण्यात आघाडीवर राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले.ही तर सुरवात आहे. आता वेळ कमी होता. मात्र, येत्या काही दिवसात पुण्यातल्या मेळाव्यात माझ्या असंख्य सहकारी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे पाटील-ठोंबरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.