Baramati Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाचा कारभार करेल असा दुसरा नेता समोर नाही. नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही. दहा वर्षे विरोध करण्यात गेली. पुढील पाच वर्षांतसुद्धा विरोध केला तर आपली कामे होणार नाहीत. त्यासाठी महायुतीच्या विचाराचा खासदार संसदेत पाठवणे गरजेचे आहे. कुणी रडतील, डोळ्यांत पाणी आणतील, पण त्यांच्या भावनिक होऊ नका, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले.
कन्हेरी (ता. बारामती) येथे शनिवारी (ता. 20) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांच्या प्रचाराचा प्रारंभ येथील मारुती मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. या वेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, काल माझ्यावर येथे झालेल्या सभेत आरोप करण्यात आले. आरोप केल्याने माझ्या अंगाला भोके पडत नाहीत. बहात्तर हजार कोटींची कर्जमाफी केली असे सांगितले गेले. मात्र ही कर्जमाफी करताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, पी. चिदंबरम हे सगळेजण यामध्ये होते. आम्हीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणली.
1991 मध्ये माझ्याबद्दल काही व्यक्ती पवारसाहेबांना म्हणाल्या होत्या की, आपल्या पुढील पिढीने राजकारणात आले पाहिजे. त्यावेळी साहेब म्हणाले होते फक्त अजितला राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे. बाकीच्यांना धंदापाण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मात्र, आता सगळ्यांनीच धंदापाणी सोडले आणि प्रचाराला लागले आहेत. खासदारकीला इकडे मतदान करा विधानसभेला आम्ही फिरणार नाही, असेही ते म्हणत आहेत. मात्र, आपल्याला खासदारकीलाही इकडेच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा. विकासकामे करण्यासाठी केंद्र सरकारचा निधी आवश्यक असतो. आपल्या विचाराचा खासदार असेल तर आम्ही नरेंद्र मोदी Narendra Modi यांना सांगू शकतो की आम्हालाही विकासकामांसाठी निधी द्या, अशी भूमिका अजित पवारांनी स्पष्ट केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काहीजण शेवटच्या सभेत रडतील, डोळ्यात पाणी आणतील, त्यामुळे कोणत्याही भावनिक अवाहनाला बळी न पडता घड्याळाला मतदान करा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. या वेळी विजय शिवतारे, मंगलदास बांदल, अॅड. सुधीर पाटसकर, यशवंत वाघमारे, वासुदेव काळे, नीलेश देवकर, सुरेंद्र जेवरे, माळेगावचे अध्यक्ष केशव जगताप, सोमेश्वरचे पुरुषोत्तम जगताप, छत्रपतीचे प्रशांत काटे, प्रदीप गारटकर, चंद्रराव तावरे, रंजन तावरे, जय पवार, प्रवीण माने आदी महायुतीतील नेते उपस्थित होते.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.