Pune News : कोथरूडचे आमदार, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, आणि पुण्याचे पालकमंत्री पद चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे असताना, पुणे महापालिकेत स्थायी समितीत, महापौरपदावर असताना मुरलीधर मोहोळ हे चंद्रकांतदादा यांच्या आगमनाकडे डोळे लावून बसायचे. तेव्हा पुण्यातील प्रकाश जावडेकर केंद्रात असताना मोहोळ हे त्यांना 'मान' द्यायचे. मात्र मोहोळ आता पुण्याचे खासदार झाले. त्यापाठोपाठ केंद्रात म्हणजे, मोदी 3.0 मध्ये राज्यमंत्री झाले.
सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतलेले, दिल्लीत राहून काही कामकाज पाहून मोहोळ आज पहिल्यांदा पुण्यात आले. मंत्रिपद मिळवलेले मोहोळ आपल्या शहरात येणार असल्याने, त्यांच्या स्वागतासाठी महायुतीने जंगी तयारी केली. महायुतीतील भाजपसह मित्रपक्षांच्या झाडून नेत्यांनी मोहोळ यांच्या 'वेलकम'साठी एअरपोर्टवर हजेरी लावली. त्यात खुद्द चंद्रकांतदादा, जावडेकर दिसून आले. आपल्याच राजकीय तालमीत घडलेल्या आणि दिल्लीत जाऊन मंत्रिपदाची गदा मिळवलेल्या मोहोळांच्या स्वागतासाठी चंद्रकांतदादा (Chandrakant Patil) आणि प्रकाश जावडेकर यांनी काही मिनिटे वाट पाहिली. मोहोळांचे आगमन होताच भला मोठा हार घालून त्यांचे स्वागत झाले.
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत झाली. पुण्यात लोकसभेच्या (Lok Sabha) मैदानात भाजप आणि काँग्रेसमध्ये (Congress) लढत झाली. यात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले. मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास भाजपमध्ये 1993 मध्ये सुरू झाला. यानंतर 2006 मध्ये नगरपालिका निवडणूक जिंकली. 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढली. पण त्यात पराभव झाला. 2017 मध्ये पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून एन्ट्री घेत स्थायी समितीचे सभापती झाले.
नोव्हेंबर 2019 मध्ये मुरलीधर मोहोळ महापौर झाले. या काळात पुणे महापालिकेशी निगडीत असलेली राज्य सरकारकडील कामानिमित्ताने मंत्री चंद्रकांतदादा यांच्याशी मुरलीधर मोहोळ यांचा नेहमी संपर्क यायचा. मुरलीधर मोहोळ यांना कामानिमित्ताने चंद्रकांतदादांची वाट पाहात बसायचे. याचप्रमाणे केंद्रात प्रकाश जावडेकर मंत्री असताना देखील कामानिमित्ताने मुरलीधर मोहोळ त्यांच्याकडे जात असायचे. त्यांची तास-तास वाट पाहात असायचे. चर्चा करायचे. काम करून घ्यायचे. हाच अंदाज आज मुरलीधर मोहोळ यांचा कामी आला आणि केंद्रात मंत्रिपद मिळाले.
मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेसाठी पुण्यातून संधी मिळाली. लोकसभेच्या निवडणुकीची त्यांची ही पहिलीच टर्म होती. मुरलीधर मोहोळ यांनी निवडणुकीत विजयाबरोबर केंद्रात राज्यमंत्री देखील झाले. केंद्रात नागरी उड्डाण खाते त्यांना मिळाले आहे. पुण्याला त्यांच्या रूपाने तब्बल 28 वर्षांनंतर मंत्रिपद मिळाले आहे.
भाजपच्या मोदी 3.0 सत्तेत मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी खात्याचा पदभार देखील संभाळला. खातीची काही कामे मार्गी लावून ते आज पहिल्यादांचा पुण्यात आले आहेत. मुरलीधर मोहोळ पुण्यात येताच त्यांच्या स्वागतासाठी पुणे जिल्ह्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह महायुतीतील दिग्गज नेते पोहोचले. मुरलीधर मोहोळ हे गेल्या 78 वर्षांतील पुण्यातील पाचवे केंद्रातील मंत्री ठरले आहेत. तसेच निवडून आल्यानंतर थेट मंत्रिमंडळात प्रवेश मिळालेले पुण्यातील ते दुसरे खासदार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.