Pune News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते तब्बल 12 सभा घेणार असून पुण्यात देखील त्यांची सभा होणार आहे. पुण्यातील उमेदवाराच्या प्रचारासाठी मोदी कधी येणार याबाबत केंद्रीय मंत्री मुलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारासाठी पुण्यामध्ये देखील येणार असून 12 तारखेला त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ते सोलापूर येथे देखील सभा घेतील. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असे प्रत्येक विभागात त्यांच्या दोन सभा होतील असे सध्याचे नियोजन आहे.
मोहोळ म्हणाले, भाजप पक्ष हा एक परिवार म्हणून काम करतो. एखाद्याला संधी मिळाली नाही तर तो नाराज झाल्यास राज्यातील सर्वोच्च नेता त्यांची भेट घेतो. हे वेगळेपण आमच्या पक्षाचा आहे. त्यामुळेच आमची जगातील सर्वात मोठी संघटना आहे. आम्ही केवळ निवडणुकांसाठी नाहीतर परिवार म्हणून एकत्रित काम करतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांची घेतलेली भेट ही कार्यकर्त्यांप्रती पक्षाने दाखवलेले प्रेम होते. त्यामुळे निश्चितच सर्वांची नाराजी दूर झाली आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या अडीच वर्षात व्यवस्थितपणे राज्याची सेवा केली आहे. आगामी निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवत आहोत. त्यामुळे या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणूक लढवत असल्याने महाराष्ट्रात कुठेही युतीमध्ये कटूता आल्याचे पाहायला मिळणार नाही, असा दावा मोहोळ यांनी केला.
वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला आणि कसबा या सह सर्व विधानसभा मतदारसंघात आम्ही एक आहोत हे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल. काही ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने नाराजी आहे. मात्र तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते ही नाराजी दूर करतील आणि उद्या अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने सर्व चित्र स्पष्ट होईल, असे देखील मोहोळ म्हणाले.
मोहोळ यांच्यावर स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्ष जी जबाबदारी देईल ते काम करत आलेलो आहे. नाव पुढे स्टार असं काही लावायचं नसतं. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात जी काही जबाबदारी पक्ष देईल ती मी पार पडणार.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.