Pimpri Chinchwad News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यभरामध्ये दोन गट निर्माण झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या राजकारणामध्ये पक्षाध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते माजी महापौर आझम पानसरे यांनी रविवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. बंद दाराआड चर्चा झाली. आझमभाईंची साहेबांशी भेट यामुळे शहरातील अजित पवार गटाने धसका घेतला आहे. (Latest Marathi News)
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणामध्ये माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे महत्त्व आहे. योगदान आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. पक्षाच्या प्रतिकूल काळामध्ये आझमभाई यांनी राष्ट्रवादीची खिंड लढवली. पिंपरी -चिंचवडमध्ये पानसरेंचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांना मानणारा गट मोठा आहे. पानसरे यांनी विधानसभा, मावळ लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, गावकी-भावकीच्या राजकारणाचा त्यांना नेहमीच फटका बसला.
मागील काळात म्हणजे २०१४ मध्ये भाजपची सत्ता राज्यात आल्यानंतर महापालिकेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. दरम्यान, चांगले काम करूनही यश मिळत नसल्याने पानसरे नाराज होते. पानसरे यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आझम पानसरे यांचा भाजप प्रवेश घडवून आणला होता. मात्र, तिथेही आझमभाईंवर अन्यायच झाला. त्यानंतर पुन्हा भाईंनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पानसरे हे साहेबांबरोबर की दादांबरोबर असा संभ्रम शहरात होता. आज पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी पानसरे यांनी भेट घेतली. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठेसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. शरद पवार यांच्याशी पानसरे यांची भेट साहेब गटाची ताकद वाढवणारी आहे. त्यामुळे शहरातील अजित पवार गट हबकला आहे.
महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचे आकर्षण विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आहे. ज्येष्ठ, युवा, तरुण, लहान मुले अशा विविध वयोगटात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजाराम कापसे यांच्या नातवास पवारसाहेबांची भेट घ्यायची होती. सकाळी कापसे कुटुंबाने साहेबांची भेट घेतली व त्यांच्याबरोबर सेल्फी काढला. साहेबांनी कापसे यांच्या नातवाशी गप्पा मारल्या. तिसऱ्या पिढीलाही साहेबांचे आकर्षण असल्याचे दिसून येत आहे.
या वेळी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना मानणारा मोठा गट आणि नेते या शहरांमध्ये आहेत. साहेबांनी शहराचा विकास केलेला आहे. त्यामुळे विकासाचे खरे साक्षीदार ज्येष्ठ नेते हे साहेबांबरोबर आहेत. ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी आज सकाळी पवारसाहेबांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. साहेबांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.''
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.