
Baba Adhav with Uddhav Thackeray News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे विधानसभा निवडणुकीत पैशांचा वापर अन् EVM विरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरु छेडलं होतं. या आंदोलनाचा शनिवारी (ता.30) तिसरा दिवस होता. तेव्हा बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळी येत, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली.
बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण आंदोलन थांबवलं. तत्पुर्वी आपलं मत मीडियासमोर मांडताना आढाव यांनी उद्धव ठाकरेंसमोरच विनोद तावडेंचा उल्लेख करत तो प्रांत संजय राऊत(Sanjay Raut) यांचा आहे आणि मी काही त्यात जात नाही, असं म्हटलं. त्यावर उपस्थितांमध्ये एकदम हशा पिकला. शिवाय उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनीही हसून यावर प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
बाबा आढाव(Baba Adhav) म्हणाले, 'मी हे आंदोलन इथे का सुरू केलं?, तर माझ्या शेजारी ठाकरे बसलेले आहेत आणि त्यांच्या मागील तीन पिढ्यांचा मी अभ्यासक आहे. आज या ठिकाणी बसण्याचं कारण, तुमच्यापैकी सर्वांना माहीत नसेल तर सांगतो की महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे सर्व साहित्य निर्माण केलं, त्यात एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे सत्यमेव जयते या शीर्षकाखाली झालेलं त्यांचं लिखाण. आज भारतीय संविधानाचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते आहे. घटना १९४७-४८मध्ये पास झाली. पण महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यमेव जयतेचा पुकारा त्याच्या ८०वर्षे आधी केला.'
बाबा आढाव पुढे म्हणाले 'आज या ठिकाणी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आले आहेत, परंतु मला सांगायचं आहे की हे आताचं आंदोलन सोडा, पण या महाराष्ट्रात ठाकरेंच्या घराण्याचं त्यांचे आजोबा आणि ते सर्वचजण ज्योतिराव फुले यांच्या चळवळीशी जुडलेले आहेत. उद्धव ठाकरे आज या फुले वाड्यात आलेले आहेत, मला माहिती नाही ही त्यांची कितवी भेट आहे की, पहिलीच भेट आहे? परंतु आज आम्ही सत्यमेव जयते हा नारा खरा ठरवण्यासाठी, सत्य शोधण्यास निघालेलो आहोत.'
याशिवाय, 'आता ज्या निवडणुका झाल्या ते बघितल्यावर मी सांगतो की ५२ वर्षांत मी एवढा पैशांचा धुमाकूळ आणि एवढा मस्तावलपणा मी पाहिलेला नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा मला असा अनुभव आलेला नाही. मात्र आता प्रचंड धुमाकूळ सुरू आहे, सत्तेचा उन्माद दिसत आहे. एकीकडे भारतीय संविधान जिंदाबाद म्हणायचं आणि आज जे काही सुरू आहे ते काय सुरू आहे? महाराष्ट्रात आता जी निवडणूक झाली, त्यामध्ये पैशांचा अपारंपार वापर झाला.'
'इतकच काय तर विनोद तावडेंसारख्या माणसाला पकडलं असताना, महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हेत. अरे वा, त्यांच्या समोर सगळं दिसतय. आता तो प्रांत संजय राऊतांचा असल्यामुळे मी तिकडे जात नाही.' असं बाबा आढाव यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.