भाजपचे बाबूराव पाचर्णे शिरूरमधून लोकसभा लढणार?: कार्यकर्त्यांच्या आग्रहाला हास्यातून दाद

आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत, योग्य वेळी नावे जाहीर केली जातील.
Baburao Pacharne
Baburao PacharneSarkarnama

शिरूर (जि. पुणे) : दुर्धर आजारातून सावरल्यानंतर माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरूर-हवेलीच्या राजकारणात पुन्हा दमदार ‘एन्ट्री’ घेतली. अभीष्टचिंतन कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी पाचर्णे यांनी आमदारकीऐवजी खासदारकी लढवावी, अशी आग्रही मागणी केली. शिरूर लोकसभेसाठी आमच्याकडे उमेदवार नाहीत, असं कोण म्हणतंय. आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत, योग्य वेळी नावे जाहीर केली जातील. शिरूर-हवेलीत विधानसभा उमेदवारीची स्पर्धा झाली तर पाचर्णे यांच्यासाठी यापेक्षा उत्तम इतरही मार्ग आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरविले तर ती जबाबदारी स्वीकारून त्यांच्यासोबत काम करण्याची वेळही पाचर्णे यांच्यावर येऊ शकते, असे सूतोवाच भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने केले. त्यावर कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत सहमतीचे शिक्कामोर्तब केले. (Baburao Pacharne from Shirur constituency will contest Lok Sabha elections from BJP)

तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर माजी आमदार बाबूराव पाचर्णे हे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. मोठ्या कालखंडानंतर तालुक्यात आलेल्या पाचर्णे यांचा ६९ वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. याच कार्यक्रमाचे निमित्त साधून त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह अनेक नेत्यांनीही आमदारकीला स्पर्धा असल्याने खासदारकी लढविण्याचा आग्रह पाचर्णे यांना धरला.

माजी मंत्री बाळा भेगडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, उपाध्यक्ष भगवानराव शेळके, भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांनी आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या वेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दौलत शितोळे, युवा नेते राजेंद्र कोरेकर, शिरूर बाजार समितीचे संचालक संतोष मोरे, खरेदी-विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे, भाजपचे शिरूर तालुका प्रचार प्रमुख राजेंद्र चव्हाण, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, भाजप महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा रश्मी क्षीरसागर, पाचर्णे यांचे कट्टर समर्थक दौलत खेडकर यांनी शुभेच्छा देताना ‘पाचर्णे यांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावे’, अशी विनंती केली. या पुढील राजकारणात मी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहील, असे सूतोवाच पाचर्णे यांनी केले होते.

Baburao Pacharne
आमच्या बंधूराजची गाडी आज लयंच जोरात होती : बारामतीत अजितदादांची फटकेबाजी!

तोच धागा पकडून राजेंद्र कोरेकर यांनी त्यांना थेट राजकारणाच्या व निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची विनंती केली. विधानसभेतील पराभवामुळे कार्यकर्ते नाउमेद झाले आहेत. अशावेळी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी त्यांच्या मनात उर्जा निर्माण करण्यासाठी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावे. मार्गदर्शक म्हणून केवळ श्रीकृष्णाच्या भूमिकेत न राहता अर्जुनाच्या भूमिकेतून थेट राजकीय युद्धभूमीवर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले.

पाचर्णे यांचा सुखकारक सहवास राजकारणात लाभला हेच आमचे भाग्य असून, राजकारणातही अभिमानाने जगायला शिकविणाऱ्या या नेत्याने पुन्हा सक्रिय व्हावे व शिरूर-हवेलीत चमत्कार घडवून दाखवावा, असे संदीप भोंडवे म्हणाले. जिल्हा परिषद, पंचायत समिती व आगामी निवडणूकीत त्यांनी केवळ एक चक्कर प्रत्येक मतदार संघात मारली तरी शिरूर-हवेलीत निश्चीतच बदल झालेला दिसेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Baburao Pacharne
देगलूर-बिलोलीत भाजपचा निघाला घाम, तर महाविकास आघाडी सरकार भक्कम

शिरूर-हवेलीतील बिघडलेल्या राजकारणाला लगाम घालण्याची ताकद फक्त बाबूराव पाचर्णे यांच्यामध्ये आहे. या मतदार संघाला शिस्त लावण्यासाठी त्यांच्याशिवाय पर्याय नाही, असे दौलत शितोळे म्हणाले. मोठ्या आजारावर मात करून समाज जीवनात परतलेल्या पाचर्णे यांनी भरकटलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एक सुयोग्य दिशा द्यावी, असे मत आबासाहेब सोनवणे यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com