Malegaon Election news : अजितदादांची कट्टर विरोधकांसोबत हातमिळवणी; माळेगावच्या निवडणुकीत वारं फिरलं, शरद पवारांनी अपक्षांना सोबत घेत टाकला डाव...

NCP Ajit Pawar alliance : नव्याने स्थापना झालेल्या माळेगाव नगरपंचायतीची यंदाची निवडणूक पहिलीच आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Political alliances Maharashtra : बारामती तालुक्यातील नव्याने स्थापन झालेल्या माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे विरोधक रंजन तावरे यांच्यात मनोमिलन झाले आहे. त्यात नगराध्यक्षपदासह बारा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व तावरे यांना सहा नगरसेवकपदाच्या जागेचा फॉर्म्युला ठरविण्यात संबंधित नेत्यांचे एकमत झाले.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एका व्यासपीठावर आलो, असे त्यांनी सांगितले. मात्र पवार-तावरे याच्या मनोमिलनात राष्ट्रवादीचे दीपक तावरे यांच्यासह अनेक इच्छुक नाराज झाले. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काही अपक्ष उमेदवारांना बरोबर घेऊन चांगली मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला. परिणामी पवार-तावरे पॅनेल जिंकण्यासाठी ‘अपक्षांविरुद्ध अधिकृत उमेदवार’ अशा लढती पहावयास मिळणार आहेत.

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी अजितदादांच्या पॅनेलविरोधात शड्डू ठोकला होता. निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत अजितदादा अध्यक्ष झाले. तर रंजन तावरेंचाही पराभव झाला होता. त्यानंतर आता नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधक एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Ajit Pawar, Sharad Pawar
CJI Bhushan Gavai news : निवृत्तीआधी CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल; दोन न्यायमूर्तींचा राज्यपालांबाबतचा निकाल बदलताना इशाराही दिला...

बारामतीच्या राजकीय नकाशावर गेल्या काही वर्षांत वेगाने वजन वाढवत गेलेले माळेगाव बुद्रुक यंदा नगरपंचायत निवडणुकीमुळे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले. विकासाच्या मुद्यांसोबतच शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, प्रशस्त रस्ते, मलनिस्सारण व नागरिकांच्या मूलभूत गरजा यावर मतदारांची नजर केंद्रित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस- माळेगाव जनमत विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, अपक्ष उमेदवारांची माळेगाव विकास आघाडी, अशी मुख्य लढत पहावयास मिळण्याची शक्यता आहे.

नव्याने स्थापना झालेल्या या नगरपंचायतीची यंदाची निवडणूक पहिलीच आहे. त्या निमित्ताने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रशासनाने गावातील मतदार संख्या सुमारे १९ हजार ५०० विचारात घेत दरम्यानच्या काळात १७ प्रभागनिहाय आरक्षण सोडत व प्रभाग रचना निश्चित केली. या नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदाचा उमेदवार सुयोग सातपुते हे आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नगराध्यक्षपदाचा उमेदवार रूपेश भोसले आहेत.

Ajit Pawar, Sharad Pawar
Maharashtra government decision : राज्य सरकारचा मोठा निर्णय : निवडणुकीच्या धामधुमीतच तालुका तक्रार निवारण समित्या बरखास्त

माळेगावमध्ये आजवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राजकीय संघर्ष पहावयास मिळाला आहे. नगरपंचायतीच्या स्थापनेपूर्वी माळेगाव ग्रामपंचायतीवर रंजन तावरे यांनी कमळाचा झेंडा फडकविला होता. त्यांनी आपला पुतण्या जयदीप विलास तावरे यांना सरपंचपदावर बसविले होते. गावात राष्ट्रवादीचे मोठे प्राबल्य असतानाही तावरे यांनी आपला राजकीय करिष्मा सिद्ध केला होता. ही प्राप्त स्थिती विचारात घेत व गावचा सर्वांगिण विकास वेगाने होण्यासाठी अजित पवार यांनी तावरे यांच्याबरोबर समझोता केला. त्यात राष्ट्रवादीचे दीपक तावरे यांच्यासह अनेक इच्छुकांना पक्षाचे तिकीट मिळाले नाही.

परिणामी अपक्ष उमेदवारांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे होणाऱ्या लढती अधिकच गुंतागुंतीच्या झाल्या. संबंधित नाराजांनी माळेगाव विकास आघाडी तयार करण्यास प्रयत्न सुरू केले आहेत. प्रभागनिहाय आरक्षण सोडतीनंतर इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची पंचायत झाली आहे, अशा परिस्थितीत उमेदवारांना आपले राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी इतर प्रभागात दंड थोपटण्याची वेळ आली.

माळेगाव नगरपंचायत निवडणूक -

नगरसेवकांची संख्या : १७

नगराध्यक्ष आरक्षण- अनुसूचित जातीसाठी राखीव

स्थानिक प्रमुख प्रश्‍न - गावच्या गायरान जागेतील वाढलेली अतिक्रमणे, वाहतूक सुरळीत होण्यासाठी सेवा रस्त्यांची निर्मिती करणे.

प्रचारातील प्रमुख मुद्दे - माळेगावात साडेतीनशे कोटीच्या कामांना शासनस्तरावर प्रशासकीय मान्यता मिळाली, बारामती शहराच्या तुलनेत माळेगाव मॉडेल व्हिलेजच्या दिशेला आणणे, ५० हजार लोकसंख्येचा विचार करून पाणी पुरवठा व सांडपाण्याची व्यवस्था करणे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com