पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्हा बॅंकेच्या (PDCC Bank election) निवडणुकीत एका जागेवर मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद (Pradip Kand) यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुले (Suresh Ghule) यांना पराभूत केले आहे. गद्दारांना पराभूत करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले होते. मात्र आजच्या निकालात कंद यांना ४०५ तर घुले यांना ३९१ मते पडली. कंद यांच्या विजयामुळे या बॅंकेवर राष्ट्रवादीच वर्चस्व असले तरी भाजपला एक अधिकृत जागा मिळाली आहे.
कंद यांच्या विजयामुळे अजित पवार यांची भीतीही खरी ठरली आहे. ते आज पुण्यात बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, पुणे जिल्हा बँक आली पण त्यात एक जागा आमच्या पॅनेलची आली नाही. १५ मतांनी पराभव झाला. मी सगळी माहिती घेत होतो. १३ मतदान केंद्र होते, त्यामध्ये ५ ठिकाणी आम्ही लीडमध्ये राहिलो. मात्र तब्बल ८ ठिकाणी आम्ही मागे होतो. कार्यकर्ते आणि पक्ष कमी पडल्यामुळे त्यामुळे ती जागा गेली.
पण बाकी सर्वच जागा चांगल्या मतांनी आल्या, अशोक पवार, सुनिल चांदोरे वगैरे यांच्या जागा येणारच होत्या. महिलांच्याही जागा चांगल्या लीड आल्या. निवडून आलेल्या सर्वाच अभिनंदन. पण एका ठिकाणी आम्ही का कमी पडलो? त्याबद्दलची थोडी माहिती घेवून काय गडबड झाली हे बघावे लागेल. कारण मला तिथे एका जागेबाबत शंका होतीच. काही ठिकाणी मत विभागली. पण बारामती, पुरंदर, दौंड अशा ठिकाणी लीड मिळाले आहे. असेही अजित पवार म्हणाले.
आज जाहिर झालेल्या इतर जागांच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. मुळशी तालुका मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनील चांदेरे यांनी गुलाल उधळला आहे. तर हवेलीमधून जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्केंना पराभवाची धूळ चारत विकास दांगट विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीने ही मैत्रीपूर्ण लढत म्हणून जाहीर केली होती. शिरुर तालुका अ वर्ग मतदार संघातून आमदार अशोक पवार यांनी एकहाती विजय मिळवला आहे. 'ड' वर्ग अन्य सहकारी संस्थांच्या मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक राष्ट्रवादीच्या दिगंबर दुर्गाडे यांनी मोठा विजय मिळवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.