
Pimpri-Chinchwad News : महाविजय २०२४ साठी भाजपने विरोधी पक्षांचे खासदार असलेले मतदारसंघ आपल्या रडारवर घेतले आहेत. त्यातही महाराष्ट्रात त्यांनी शिरूर आणि मावळवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी त्यांनी शिरूरकरिता, तर खास उत्तर पुणे जिल्ह्याची निर्मिती करून हा गड ताब्यात घेण्यासाठी तेथे पक्षबांधणी आणि निवडणूक तयारीही आतापासून जोरात सुरू केली आहे.
१९ जुलैला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवडसह सत्तर जिल्हाध्यक्षांची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी नव्याने तयार केलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा पुणे जिल्हा नियोजन समितीचे (डीपीडीसी) सदस्य शरद बुट्टे पाटील यांची नेमणूक केली. गेल्या आठवड्यात (ता.१७) पिंपरी-चिंचवड आणि पुणे भाजप जिल्हाध्यक्षांनी आपापल्या कार्यकारिणी जाहीर केल्या.
त्यानंतर उत्तर पुणे (Pune) जिल्ह्याचीही ती आज जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच त्यांनी आगामी लोकसभेची निवडणूक तयारी आणि त्यासाठी जोरदार पक्षबांधणी सुरू केली आहे. त्याकरिता जिल्ह्यातील शिरूर-हवेली, आंबेगाव आणि खेड-आळंदी या तीन विधानसभा मतदारसंघांसाठी समन्वयक, तर दहा मंडल अध्यक्ष रविवारी बुट्टे पाटील यांनी नेमले. ग्रामीण भागात पक्ष प्रस्थापित करून तेथील कार्यकर्ते सक्षम करण्यासाठी त्यांना दोन दिवसांचे ट्रेनिंग रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत देणार आहे, असे या नेमणुकीनंतर बुट्टे पाटील यांनी 'सकारनामा'ला सोमवारी सांगितले.
या वेळी भाजपने राष्ट्रवादीचा शिरूरचा गड जिंकून पवारांना शह द्यायचे ठरवले आहे. त्यासाठी तेथे केंद्रीय मंत्र्यांचे दौरे वाढले आहेत. भाजपकडून (BJP) तेथे लढण्याची तयारी दाखविलेले भोसरीचे त्यांचे आमदार महेश लांडगे यांना त्यांनी या मतदारसंघाचे समन्वयक म्हणून नेमले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार येऊन मिळाल्याने आता त्यांचा आत्मविश्वास आणखी दुणावला आहे.
कारण आता तेथे महाविकास आघाडी (शरद पवार राष्ट्रवादी) विरुद्ध महायुती (भाजप) अशी थेट आणि चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. आघाडीचे उमेदवार हे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हेच असतील, तर भाजप आमदार महेश लांडगेंना प्रमोशन देऊन त्यांना खासदार करण्याच्या बेतात आहे.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.