

Pune News: भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेल्या जगदीश मुळीक यांना अचानकपणे वैद्यकीय समस्या जाणवली. समस्या गंभीर असल्याने गोंधळून गेलेल्या जगदीश मुळीक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला अन् काही वेळानंतर फडणवीस यांनी थेट डॉक्टरची अपॉइंटमेंटच बुक करून मुळीकांना ऍडमिट होण्याचा सल्ला दिला.
याबाबतचा प्रसंग जगदीश मुळीक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे आणि भावाप्रमाणे प्रेम करणारे देवाकडून असा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये जगदीश मुळीक म्हणाले, कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे विसरता येत नाहीत. अलीकडे मी माझी सीटी अँजिओग्राफी करून घेतली होती. त्याचा रिपोर्ट चुकीचा आल्याने पुण्यातील डॉक्टरांनी काळजी व्यक्त केली. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत मी तत्काळ आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांना फोन केला.
त्यानंतर फक्त तीन मिनिटांतच फडणवीस यांनी स्वतः डॉक्टरांशी संपर्क साधून मला परत फोन केला आणि शांतपणे सांगितले, “जगदीश, उद्या दुपारी चार वाजता डॉ. रमाकांत पांडा यांना भेट, मग पुढचं आपण ठरवू.” दुसऱ्या दिवशी मी डॉ. पांडा यांना भेटलो. त्यांनी तपासणी करून तत्काळ अँजिओग्राफी केली आणि परिस्थिती लक्षात घेऊन लगेचच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतले. पुढच्या दिवशीच माझी बायपास सर्जरी करण्यात आली. हे सर्व इतकं अचानक आणि तातडीचं झालं की कोणाशी काही बोलण्यासही वेळ मिळाला नाही. त्या संपूर्ण काळात माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळी माझ्यासोबत ठाम उभे राहिले, असं जगदीश मुळीक म्हणाले.
या सर्व प्रसंगात देवाभाऊंनी ज्या प्रकारे माझी काळजी घेतली, ती खरंच लहान भावासारखी होती. मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील माणूस म्हणून त्यांनी दाखवलेली तत्परता, आत्मीयता आणि जिव्हाळा मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांनी डॉक्टरांशी स्वतः संवाद साधला, उपचाराची तातडीने व्यवस्था केली आणि आज, ऑपरेशननंतर काही दिवसांनी, स्वतः भेट द्यायलाही आले. त्यांच्या या भेटीतून मिळालं ते फक्त आशीर्वाद नव्हे, तर मानसिक बळ आणि आत्मविश्वासाचा अनमोल आधार असल्याचं जगदीश मुळक यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस हे फक्त नेता नाहीत, तर कार्यकर्त्यांना भावासारखे समजणारे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला अशाच नेतृत्वाची गरज होती आणि ते नेतृत्व आपल्याला देवभाऊंच्या रूपाने लाभले आहे, असं जगदीश मुळीक म्हणाले.
या काळात माझ्या उपचारासाठी तत्परतेने मदत केलेल्या डॉ. रमाकांत पांडा तसेच त्यांची संपूर्ण टीम, डॉ. ज्ञानेश गवारे आणि डॉ. अभिजित लोढा यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या कौशल्यपूर्ण सेवेमुळे आणि देवभाऊंच्या संवेदनशील तत्परतेमुळे आज मी पुन्हा एकदा बळकट उभा आहे.माझ्या कुटुंबीयांचे, मित्रांचे, कार्यकर्त्यांचे आणि सर्व जनतेचे प्रेम, साथ आणि आशीर्वाद याबद्दल मी अंतःकरणपूर्वक आभारी आहे.
सध्या माझी तब्येत सुधारते आहे, काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मी लवकरच पुणेकरांच्या सेवेत पुन्हा रुजू होणार असल्याचं जगदीश मुळीक यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.