उत्तम कुटे
पिंपरी : तळेगाव दाभाडे (मावळ) (Pune) नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भुमीपूजन आणि तालुक्यातील १८० कोटी रुपयांच्या विविध कामांचे भुमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते झाले. मात्र भुमीपूजन झालेल्या नगरपरिषदेच्या या जागेचे भाजपने (BJP) गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. (BJP leaders criticised NCP leader Ajit Pawar for wrong statement)
मावळ गोळीबाराला कारणीभूत अजित पवारांच्या हस्ते सदर भुमीपूजन झाल्याने त्या जागेचे शुद्धीकरण केले, असे शुद्धीकरण करणारे भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितले.
पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेला विरोध करणाऱ्या मावळातील शेतकऱ्यांवर ९ ऑगस्ट २०११ रोजी गोळीबार करण्यात आला होता. त्यात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला, तर ११ जण जखमी झाले होते. त्याला तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार कारणीभूत असल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यांच्या हस्ते काल हे भुमीपूजन झाल्याने सदरची जागा अपवित्र झाली होती. म्हणून तिचे शूद्धीकरण केले. यातून कालच्या कार्यक्रमाचा निषेध केला, असे भेगडे म्हणाले.
दरम्यान, ही भाजपची स्टंटबाजी असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या शुद्धीकरणाच्या इव्हेंट नंतर केला.
भुमीपूजनाचा कार्यक्रम सरकारी नव्हे, तर राष्ट्रवादीचा मेळावा होता. म्हणून त्यावर बहिष्कार टाकला होता, असे माजी राज्यमंत्री व मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी या शुद्धीकरणानंतर सांगितले. गेल्य़ा वीस वर्षात मावळसाठी जेवढा निधी आला नाही, तेवढा तो गेल्या अडीच वर्षात आणण्यात आला. कारण तो आणण्यासाठी अक्कल लागते, असा हल्लाबोल कालच्या भुमीपूजनात करण्यात आला होता. त्याचा खरपूस समाचार श्री. भेगडे यांनी घेतला.
ते म्हणाले, गेल्या पन्नास वर्षापासून बारामती तालुक्यातील १८ गावे तहानलेली आहेत. त्यांची तहान भागविण्यासाठी अजित पवारांनी अक्कल असेल, तर ती वापरावी. मावळच्या जनतेला त्यांनी अक्कल शिकवू नये. त्यांना राज्यात किती कॅन्टोनमेंट आहेत, हे सुद्धा माहिती नाही, असेही ते म्हणाले. आघाडी सरकारच्या काळात पाच वर्षात मावळसाठी फक्त ७० कोटी रुपये देण्यात आले. तर, नंतरच्या फडणवीस सरकारने तीनशे कोटी रुपये दिले, असा दावा त्यांनी केला.
आपल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात किती रुपयांचा निधी आणला व त्यातून काय काय कामे केली याची जंत्रीच त्यांनी यावेळी वाचून दाखवली. तळेगाव नगरपरिषद इमारतीला डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्याची मागणही त्यांनी केली. तसा ठरावही झाला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ते पुढे म्हणाले, तुमची सत्ता किती दिवसांची आहे, हे आम्ही पाहणार आहे. मविआ सरकार हे काही दिवसच टिकणार असल्याची नवी भविष्यवाणी काल त्यांनी केली. या सरकारने आमच्या काळात मंजूर केलेली कामे गेली दीड वर्षे बंद ठेवली. बंद केलेल्या या कामांच्या ठेकेदारांकडून पैसे घेऊन आता कार्यक्रम केले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.