Pimpri Political News : पिंपरी - चिंचवड महापालिकेत शेकडो कोटी रुपयांचा 'टीडीआर' घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेत विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी नुकताच केला. त्यानंतर शहरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात शहरातील भाजपचे भोसरीचे महेश लांडगे, चिंचवडच्या अश्विनी जगताप आणि पिंपरीचे अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अण्णा बनसोडे हे तीन आमदार आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह हे सहभागी असल्याचा सनसनाटी आरोप केला होता.
दरम्यान, वरील तिन्ही आमदारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट आणि भाजपने या टी़डीआर घोटाळ्यावर कसलीच भूमिका न घेतल्याने संशय बळावला होता. मात्र, आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस (Devendra Fadnavis) यांनाच पत्र देत या घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी आता केली आहे.
तसेच वाकड येथील भूखंडाच्य़ा विकासासाठी दिलेली बांधकाम परवानगी आणि त्याबदल्यात पिंपरी महापालिकेने दिलेला 1136 कोटींचा टीडीआर रद्द करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून त्यांच्यासारखीच भूमिका शहरातील इतर दोन आमदारही घेणार का, याकडे लक्ष लागले आहे.
भाजपचे वरिष्ठ शहर उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राजू दुर्गे यांनीही वाकडच्या भूखंड गैरव्यवहारात दीड हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. त्यानंतर शहर भेटीवर आलेले उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही याप्रकरणी संशय व्यक्त करीत चौकशीचे संकेत नुकतेच दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे हा टी़डीआर देणारे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्यावर हा घोटाळा शेकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, विरोधकांचा हल्लाबोल, त्यात संभाजी ब्रिगेडने याबाबत ईडी चौकशीची केलेली मागणी यानंतर आमदार जगतापांनी तर थेट न्यायालयीन चौकशीचीच मागणी केल्याने हा घोटाळा गाजणार अशी लक्षणे दिसू लागली आहेत.
मे. विलास जावडेकर इन्फिनिटी डेव्हलपर्स प्रा. लि. ला वाकड येथील हा भूखंड विकसनासाठी देताना अंदाजपत्रक फुगवले गेले. प्रतीचौरस मीटर बांधकामाचा खर्च रेडी रेकनरपेक्षा जास्त दाखवला गेला. त्यातून विकसकाचा 671 कोटींचा फायदा करून दिल्याचा आरोप आमदार जगताप यांनी फडणवीसांना दिलेल्या पत्रात केला आहे.
665 कोटींचा टीडीआर देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात 1136 कोटींचा देण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. हा भूखंड विकसनासाठी देताना आणि त्याबदल्यात टीडीआर कसा गैरप्रकार झाला आहे, हे त्यात त्यांनी मांडले आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.