पिंपरी : महापालिकांच्या निवडणुकीची जबाबदारी प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शुक्रवारी (ता.२५) निश्चीत करण्यात आली. त्यानुसार पक्षाची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी शहराबाहेरील पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पिंपरी महापालिकेत पुन्हा भाजपच (BJP) सत्तेत येणार असून शंभर प्लस नगरसेवक निवडून येतील, अशी प्रतिक्रिया या जबाबदारीनंतर मिसाळ यांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना दिली.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे भोसरीत महेश लांडगे (Mahesh Landage) , तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) असे दोन आमदार आहेत. मात्र, पुण्याप्रमाणे शहरातील पक्ष पदाधिकाऱ्याकडे पालिका निवडणुकीची जबाबदारी पिंपरीत, मात्र देण्यात न आल्याने त्याची चर्चा आहे. दोन आमदारांचेच नाही, तर एकनिष्ठ भाजप असे तीन गट पिंपरी भाजपमध्ये आहेत. त्यामुळे एका गटाच्या म्होरक्याकडे ही जबाबदारी दिली असती, तर बाकीचे नाराज झाले असते. त्याचा फटका पुन्हा सत्ता येण्यात आणि शंभर प्लस नगरसेवक निवडून आणण्यात बसला असता. म्हणून निवडणुकीला एकत्र सामोरे जाऊन पुन्हा सत्तेत येण्यासाठी शहराबाहेरील व्यक्तींकडे पालिका निवडणुकीची जबाबदारी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे समजते. त्यातून त्यांनी शहर भाजपला, तेथील आपल्या दोन्ही कारभारी आमदारांना नेमका संदेशही दिला आहे.
अत्यंत अटीतटीने होणारी व राष्ट्रवादी काँग्रेससारखा (NCP) राज्याच्या सत्तेत असलेला बलदंड माजी सत्ताधारी पक्ष प्रतिस्पर्धी असलेली पिंपरी पालिकेची निवडणूक तेवढ्या सक्षमतेने मिसाळ या पार पाडणार का असा प्रश्न लगेच विचारला जाऊ लागला आहे. कारण त्या दोन वर्षापासून शहर प्रभारी आहेत. दर आठवड्याला शुक्रवारी शहरात येऊ, असे त्यांनी प्रभारी होताच सांगितले होते. पण, तसे झालेले नाही. त्यांना प्रभारी म्हणून तेवढी छाप पाडता आलेली नाही.
परिणामी शहरातील दोन्ही कारभारी आमदारच कारभार हाकत आहेत. त्यांचेच पक्ष संघटनेवर नियंत्रण आहे. त्याला दुजोरा देणारे वक्तव्य मिसाळ यांनी स्वतच आज केले. मी पिंपरी-चिंचवड शहर प्रभारी अगोदरपासूनच आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीची जबाबदारी ही नवी नाही. निवडणूक प्रमुख म्हणून शहरातील दोन्ही आमदार असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीची तयारी झाली असून प्रभाग आढावा घेण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. आता आरक्षण पडल्यानंतर पुढील स्ट्रॅटेजी ठरविण्यात येईल, असे त्या म्हणाल्या. शहराचा एकूण आढावा घेता शंभर टक्के पुन्हा भाजपच सत्तेत येणार, आमचे शंभर प्लस नगरसेवक निवडून येणार, असा दावाही त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.