बारामती : पवारांच्या (Pawar) बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने (BJP) आज (ता. ६ सप्टेंबर) श्रीगणेशा केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बारामतीत (Baramati) येत भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासोबत हा गड जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद लावणार असल्याचे सांगत मिशन बारामतीच्या दृष्टीने रणशिंग फुंकले. (BJP will definitely win Baramati Lok Sabha 2024 : Chandrashekhar Bawankule)
चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्यांवर स्पष्टपणे मते मांडली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहूल कुल, आमदार गोपीचंद पडळकर, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, दिलीप खैरे, पांडूरंग कचरे, सतीश फाळके आदींची उपस्थिती होती. बावनकुळे म्हणाले की, संघटना मजबूत होईल, तेव्हा बारामतीचा राष्ट्रवादीचा गडही उद्ध्वस्त होईल. गड कोणा एकाच्या मालकीचा नसतो, वेळेनुसार बदल होत राहतो, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीचा गड आम्ही नक्की जिंकू.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची मोट बांधली जात आहे असे विचारता, पवार यांचा तो अधिकार आहे. प्रत्येकाला आपले संघटन वाढविण्याचा अधिकार असतो. राज्यात राष्ट्रवादीचा इतिहास पाहिला तर आठ जागांवर हा पक्ष गेलेला नाही. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरु म्हणून ओळखले जातात. विरोधकांकडे फक्त राजकीय व्हिजन आहे. त्यातून त्यांना आपापली दुकाने चालवायची आहेत. मोदी देशासाठी काम करत आहेत. जो राष्ट्रासाठी काम करतो. त्यांच्या मागे जनता उभी राहते.
काटेवाडी गावापासून दौरा सुरु करत असल्याबद्दल विचारले असता बावनकुळे म्हणाले, प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांना ताकद मिळाली पाहिजे, यासाठी काटेवाडीत जात आहे. बारामतीत प्रत्येकाला यावंसं वाटत, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, सुळे काय म्हणाल्या, ते मला माहिती नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्या येत आहेत. खासदार म्हणून सुप्रिया सुळे त्यांना भेटू शकतात.
बारामतीसह राज्यातील सर्व जागांवर आम्ही लढणार आहोत. आमची संघटना वाढवणे, ताकद वाढविणे, उमेदवार निवडून आणणे ही पक्षाची जबाबदारी आहे. बारामतीची जागा जिंकायची, हा आमचा निश्चय आहे. त्यामुळे आम्ही कोणाविरुद्ध लढतोय हा अजेंडा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप बारामतीची जागा कोणत्याही स्थितीत निवडून आणेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांची प्रशंसा करतात मग बारामती टार्गेट का, या प्रश्नावर ते म्हणाले, एखाद्याने चांगले काम केले तर त्यांची प्रशंसा करण्यात गैर काय. परंतु बारामती मतदारसंघात अजूनही ४५ टक्के जनता उपेक्षित आहे. ओबीसी मराठा, धनगर समाजाचे प्रश्न कायम आहेत. चार-दोन लोक मोठे झाले म्हणजे समाज मोठा होत नाही. मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बारामती मतदारसंघाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांनी गणेशाचे दर्शन घेत राज्याची संघटनात्मक बैठक घेतली, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
बारामतीत आजवरची सर्वांत मोठी लढाई लढू
केंद्रीय अर्थमंत्री व आमच्या राष्ट्रीय नेत्या निर्मला सीतारामन या बारामती मतदारसंघाच्या प्रभारी आहेत. पुढील दीड वर्षात त्यांचे पाच ते सहा वेळा प्रत्येकी तीन दिवसांचे दौरे होतील. केंद्र, राज्याच्या योजना त्या जनतेपर्यंत पोहोचवतील. केवळ घोषणाबाजी, चर्चा नव्हे; तर पक्ष मजबूत करून आजवरची सर्वात मोठी लढाई आम्ही २०२४ ला लढू आणि जिंकू.
भाजपचे ४०० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट
बारामतीत कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे घेतील. जेथे आपण कमजोर असतो. तेथे अगोदरपासून तयारी करावी लागते. बारामतीसह देशातील 400 पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा आम्ही जिंकू. बारामतीचा उमेदवार केंद्रीय नेतृत्व ठरवेल. परंतु आजवर झाली नाही अशी लढत २०२४ मध्ये येथे पाहायला मिळेल, असे बावनकुळे म्हणाले.
कल्याणकारी योजनांचे ऑडीट होईल
मागील अडीच वर्षांत केंद्राच्या अनेक योजनांना राज्य सरकारने ब्रेक लावला. आता एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवीन सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात केंद्र, राज्याकडून काय कामे अपेक्षित आहेत, यात लक्ष घालण्यात येईल. कल्याणकारी योजनांना ब्रेक लावला असेल तर त्याचे ऑडीट होईल. अर्थमंत्री सीतारामन या अधिकाऱ्यांच्याही बैठका घेतील. भरगच्च २१ कार्यक्रम त्या घेणार आहेत. मतदारसंघाचे विश्लेषण करून पुढील दौऱ्यात काय मदत केली पाहिजे, ती करतील. बारामतीसह राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघावर आम्ही पहिल्या टप्प्यात लक्ष केंद्रीत केले आहे. विधानसभेला राज्यात २०० पेक्षा अधिक जागांचे उद्दिष्ट शिंदे व फडणवीस यांनी ठेवले असल्याचे बावनकुळे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.