
Pune News : ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या 'एसटी'ची भाडेवाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे.
मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्यानंतर 'एसटी'च्या तिकीट दारात वाढ झाली की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्य परिवहन प्राधिकरणाची 276वी बैठक आज परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, राज्य परिवहन (State Transport) प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) आणि परिवहन आयुक्त सह राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य देखील उपस्थित होते. या बैठकीत एसटीची 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे.
'एसटी'च्या भाडेवाढबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'एसटी'च्या जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन चांगली सुविधा ग्रामीण आणि शहरी भागात देण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे भाडेवाढ करणे आवश्यक असून त्याबाबतची चर्चा सुरू आहे. मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पहाटेच परदेशातून आलेले आहेत. हे महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालूनच घेणे आवश्यक असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विचारून पुढचा निर्णय घेण्यात येईल. मात्र शेवटी 'एसटी' महामंडळ पण व्यवस्थित चाललं पाहिजे आणि जनतेचा त्रास कमी झाला पाहिजे. यासाठी मध्यममार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, टायर, डिझेलसह 'एसटी'च्या इतर स्पेअर पार्टच्या किमती वाढल्या आहेत. तसेच महागाई भत्ता देखील वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे व्यवस्थापकीय संचालकांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पत्रानुसार प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास राज्य परिवहन प्राधिकरणाच्या 276व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे आता नवीन भाडेवाढ आकारली जाणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.