पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक (Local Body Election) सहा महिने पुढे नेणारा कायदा नुकताच राज्य सरकारने (Maharashtra Government) केला. मात्र, त्याला कोणी न्यायालयात आव्हान दिले, तर निवडणूक लगेच मे महिन्यातही होऊ शकते. म्हणून त्यादृष्टीने कार्यकर्ते तयारीत रहावेत या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) गुरूवारपासून (ता.२४ मार्च) प्रभागनिहाय संपर्क अभियान सुरु केले. भाजपच्या (BJP) नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेले, पण राष्ट्रवादीत प्रवेश न केलेले माजी नगरसेवकही त्यात सामील झाले होते, हे विशेष.
राष्ट्रवादीचे नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही कधीही महापालिका निवडणूक होऊ शकते, म्हणून तयारीत रहा, असा आदेश नुकताच पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिला आहे. त्यातूनच हे अभियान पिंपरीत सुरु करण्यात आले आहे. शहरातील तीनपैकी पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आहेत. तेथील दोन टीमने हे अभियान काल घेतले. तर, चिंचवड आणि भोसरी या भाजप आमदारांच्या मतदारसंघात ते एकेक घेण्यात आले.
भोसरीतील अभियानात गतवेळी २०१७ ला बिनविरोध निवडून आलेले भोसरीतील भाजपचे नगरसेवक रवी लांडगे हे ही सामील झाले होते. त्यांनी मुदत संपण्यापूर्वीच नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेला आहे. ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. मात्र, अद्याप त्यांनी तो केलेला नाही. मात्र, मनाने ते कधीच त्या पक्षात गेलेले आहेत. त्यातून ते काल राष्ट्रवादीच्या या मोहिमेत सहभागी झाले होत, अशी चर्चा यानंतर भोसरीत ऐकायला मिळाली. तर, चिंचवडमधील या अभियानात भाजपच्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेल्या, पण राष्ट्रवादीत प्रवेश न केलेल्या माया बारणे सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे त्या ही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याला दुजोरा मिळाला आहे. त्यांचे पती व अगोदरच राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी या अभियानाचे नियोजन केले होते.
शहर संघटनात्मक बांधणीसाठी प्रभागनिहाय संपर्क अभियान सुरु केले असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाठी दोन अशा सहा टीम तयार केल्या आहेत. बूथ कमिट्या सक्षम करणे, प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे. राज्य सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्याबाबत अभियानात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. याशिवाय महापालिकेत सत्तेत असताना भाजपने केलेली चुकीची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना केले जाणार आहे. हे अभियान आठ दिवस चालणार आहे, अशी माहिती गव्हाणेंनी दिली.
नगरसेवकांचा कालावधी संपल्याने पिंपरी महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरु झाली आहे. महापालिकेची निवडणूक कधीही लागू शकते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचाही हेतू यामागे असल्याचे ते म्हणाले. पिंपरीत आमदार बनसोडे यांच्या, तर भोसरीत माजी आमदार विलास लांडे यांच्या देखरेखीखाली टीम काम करणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.