Pimpri-chinchwad: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १५१ कोटी रुपयांच्या जॅकवेलच्या निविदेत गत सत्ताधारी भाजप (BJP) नेत्यांनी प्रशासनाच्या संगनमताने तीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) बुधवारी (ता.३०) केला होता. त्यावर हा भ्रष्टाचार झाल्याचे राष्ट्रवादीने सिद्ध केले, तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ, असे आव्हान भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि पिंपरी पालिकेतील पक्षाचे माजी सभागृहनेते एकनाथ पवार यांनी काल (ता.१)दिले होते.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतर शहरातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी लगेच महापालिकेला मेल करीत जॅकवेलच्या निविदेत वीस ते २५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला.त्यामुळे राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला पुष्टी मिळाली आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्याकडे आ.जगतापांनी केली आहे.पण,सध्या पालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने या भ्रष्टाचाराशी भाजपचा कसलाही सबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या कामाची निविदा विशिष्ट ठेकदार वगळता इतर कोणीही भरणार नाही, याची काळजी पाणीपुरवठा विभागाने घेतली होती,याकडे त्यांनी लक्ष वेधत या घोटाळ्यात पाणीपुरठा विभागाचे अधिकारी दोषी असल्याचे त्यांनी सांगितले.या विभागाच्या भ्रष्ट,आडमुठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे निविदा भरण्याच्या भानगडीत नवीन कंत्राटदार पडत नाहीत,असे ते म्हणाले.
दरम्यान,जॅकवेलच्या कामाची ही निविदा पिंपरी पालिकेचे सबंधित अधिकारी आणि विशिष्ट ठेकेदार यांनी संगनमत करून काढल्याने ती पुन्हा काढण्याची मागणी आ. जगताप यांनी दोन महिन्यांपूर्वीच शेखरसिंह यांच्याकडे केली होती. निकोप स्पर्धा न झाल्याने या निविदेव्दारे पालिकेला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार असल्याची भीती त्यांनी २८ सप्टेंबरच्या या मागणी पत्रात व्यक्त केली होती.स्थापत्य व विद्युत्च्या कामाची जाचक अट या निविदेत होती.ती पूर्ण करणारे ठेकेदार खूप कमी आहेत. म्हणून या निविदेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता.परिणामी निकोप स्पर्धा होऊन पालिकेची बचत न कोट्यवधी रुपयांचे नुकसानच होणार होते. म्हणून जॅकवेलच्या विद्युत आणि स्थापत्यच्या कामासाठी स्वतंत्र निविदा काढण्याचा सल्ला त्यांनी दिला होता.त्यामुळे स्पर्धा निकोप होऊन बिलो टेंडर पालिकेला मिळेल. परिणामी कोट्यवधी रुपये वाचतील,असे त्यांनी म्हटले होते.पण, पालिका प्रशासनाने या पत्राला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे दिसून आले आहे.कारण त्यावर अद्यापपर्यंत कसलीच कार्यवाही झाली नसल्याचे आ. जगताप यांचे बंधू आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी `सरकारनामा` ला सांगितले.
२८ जुलै प्रसिद्ध झालेली ही निविदा १२० कोटी रुपयांची होती. प्रत्यक्षात हे काम १५१ कोटी रुपयांना ते ही बाहेरील राज्यात काळ्या यादीत गेलेल्या ठेकेदाराला देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. म्हणूनच त्यात तीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत परवा गत टर्ममधील विरोधी पक्ष राष्ट्रवादीच्या वतीने पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय़्या आंदोलन करण्यात आले होते. तसेच पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांना त्यांनी घेराव घातला होता.त्यानंतर गेल्यावेळचे पालिकेतील सत्ताधारी भाजपनेही या निविदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत त्यात पालिका अधिकारीच सामील असल्याचा आरोप केल्याने प्रशासन तथा प्रशासक आयुक्तांची दुहेरी कोंडी झाली आहे. ते आता ही निविदा रद्द करून पुन्हा ती काढतात का आणि पाणीपुरवठा विभागाच्या दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई कऱण्याचे धाडस दाखवतात का,याकडे शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.