वेल्हे (जि. पुणे) : दोन वेळा पुढे ढकलण्यात आलेला अजित पवार (Ajit Pawar) यांचा बहुचर्चित वेल्हे दौरा अखेर ठरला. येत्या मंगळवारी (ता. ३० नोव्हेंबर) ते तालुक्यात येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा नुकताच मेळावा झाला, त्यात पटोले यांनी बारामती मतदारसंघाबाबत भाष्य केले होते. ज्या ठिकाणी काँग्रेसचा मेळावा झाला, त्याच ठिकाणी अजित पवारांची सभा होणार असून ते पटोले यांना काय उत्तर देणार, याकडे संपूर्ण भोर-वेल्हे-मुळशी मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar will visit Velhe taluka on Tuesday)
वेल्हे तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विकास कामांवरून श्रेयवाद रंगलेला आहे. दोन्ही काँग्रेसचे स्थानिक नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे अजितदादा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संग्राम थोपटे यांच्या मंत्रीपदाबाबत भाष्य करतानाच वेल्ह्यातील विकासकामांबाबतही विधान केले होते. त्याचा समाचार पवार कशा पद्धतीने घेतात, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
अजित पवारांची वेल्ह्यात होणारी सभा दोन वेळा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे वेल्हे तालुक्यातील बहुचर्चित काँग्रेस, भाजप व मनसेतील अनेकांचे राष्ट्रवादीत होणारे पक्षप्रवेश रखडले होते. तसेच, राष्ट्रवादीच्या तालुकास्तरीय काही नियुक्त्या अजित पवारांच्या सभेत होणार आहेत. येत्या मंगळवारी होणाऱ्या सभेत हे पक्षप्रवेश आणि नियुक्तांचा सोपस्कर पूर्ण होणार आहे. तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मेंगाईदेवी मंदिराच्या प्रांगणात ज्या ठिकाणी काँग्रेसची सभा झाली, त्याठिकाणीच राष्ट्रवादी काँग्रेसनेही अजित पवारांनी सभा आयोजित केली आहे.
वेल्हे पंचायत समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता असून तालुक्यातील जिल्हा परिषदेचे दोन्ही सदस्यही काँग्रेसचेच आहेत, त्यामुळे नाना पटोले यांच्या सभेस मोठी गर्दी जमवून काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली आहे. गेली दहा वर्षांपासून वेल्हे राष्ट्रवादी सत्तेपासून दूर आहे. त्यातच अजित पवारांच्या सभेच्या तयारीसाठी अवघे दोन दिवस मिळाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते गर्दी जमविण्यात यशस्वी होतात का, याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात अजित पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय संदेश देतात. तसेच, ते नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना कसे उत्तर देणार, याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.