
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेल्या ज्या पिशव्यांतून आनंदाचा शिधा दिला जाणार होता, त्या न आल्याने पिंपरी-चिंचवडच नाही, तर इतरत्रही या शिध्याचे वाटप वेळेत आणि पूर्ण झाले नाही. परिणामी गरिबांचा पाडवा, तर कडू झालाच, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत हा शिधा वाटपाचे लक्ष्यही पूर्ण झाले नाही.
दरम्यान, दिवाळी, गुढीपाडवा आणि आता डॉ.आंबेडकर जयंती अशी आनंदाचा शिधा वेळेत पूर्ण न देण्याची हॅटट्रिक राज्य सरकारने केली आहे. परिणामी गरिबांचे हे सण गोड झालेच नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचाही फटका त्याला बसला. त्यामुळे पाडव्यालाच राष्ट्रवादी, कष्टकरी संघर्ष महासंघाने राज्य सरकारचा निषेध केला होता.
एकेक किलो साखर, रवा, चनाडाळ आणि पामतेल असे साडेचारशे रुपयांचे चार जिन्नस शंभर रुपयांत आनंदी शिधा म्हणून देण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयोग दिवाळीत गेल्यावर्षी फसला. कारण दिवाळी झाल्यानंतर तो मिळाला. त्यामुळे गरीबांची दिवाळी गोड झाली नव्हती. तरीही त्यापासून कसलाच बोध न घेता हा फसलेला प्रयोग राज्य सरकारने यावर्षी पुन्हा राबविण्याचे ठरवले.
पाडवा (२२ मार्च) ते डॉ.आंबेडकर जयंतीपर्यंत (१४ एप्रिल) तो देण्याचे ठरले. पाडव्याला तो मिळाला नाही. त्यामुळे हा सणही त्यांचा गोड झाला नाही. डॉ.आंबेडकर जयंती उद्यावर आली, तरी त्याचे वाटप पूर्ण झालेले नाही. फक्त १३ टक्के तो पिंपरी-चिंचवडमध्ये देण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापर्यंत तो शंभर टक्के मिळण्याची अजिबात शक्यता नाही.
दरम्यान, आनंदाचा शिधा रखडण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न 'सरकारनामा'ने केला असता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे फोटो असलेल्या ज्या पिशव्यांतून तो देण्यात येणार होता, त्या न आल्याने हे शिधावाटप खोळंबल्याचे कळले. दिवाळीतही याच पिशव्यांअभावी तो मिळाला नव्हता.
आनंदाच्या शिध्याचे चार जिन्नस आले. मात्र, ते ज्यातून दिले जाणार त्या पिशव्या न आल्याने हे वाटप सुरु केले नसल्याचे एका रेशन दुकानदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ज्या रेशन दुकानात या पिशव्या आल्या तेथे मात्र, ते सुरु झाले आहे. पण,अशा दुकानांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच आहे.
(Edited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.